
नागपूर : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे.
दीपाली चव्हाण यांनी २६ मार्चला त्यांच्या राहत्या घरी सव्र्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या के ली होती. दीपालीने आत्महत्येपूर्वी श्रीनिवास रेड्डी यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यांनी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार यांच्यावर छळ केल्याचा ठपका ठेवला होता. राज्यसरकारने ३० मार्चला रात्री उशिरा रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश काढले होते. त्याचवेळी रेड्डी यांच्या भूमिकेविषयी चौकशी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली. निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने दीपाली चव्हाण यांचा प्रचंड मानसिक छळ केला होता. याची माहिती श्रीनिवास रेड्डी यांना वेळोवेळी देण्यात आली. त्यानंतरही त्यांनी कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे रेड्डी यांनी त्यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे पालन व्यवस्थित न केल्याची बाब दीपाली यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरली का, याची चौकशी करण्याचे काम डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या समितीकडे सोपवण्यात आले होते. डॉ. सरवदे यांनी त्यांचा अहवाल मंत्रालयातील वनखात्याकडे सोपवल्यानंतर या अहवालाच्या आधारे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला सुमारे १२-१३ दिवसांपूर्वी आरोपपत्राबाबत ई-मेल आला. या आरोपपत्रात रेड्डी यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आल्याचे कळते. दरम्यान, राज्य सरकारने येत्या सप्टेंबपर्यंत त्यांच्या निलंबन कालावधीत वाढ के ली आहे, असे वनखात्याचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी सांगितले.





