37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पूरपरिस्थितीची भौगोलिक पाहणी करिता जिल्हाधिकारी फिल्डवर

पूरपरिस्थितीची भौगोलिक पाहणी करिता जिल्हाधिकारी फिल्डवर

0
81

blank

पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी खवले

गोंदिया,दि.10 : मान्सून कालावधीत पूर परिस्थितीचे आव्हान पेलण्यासाठी जिल्हा प्रशासन ताकदीने सज्ज आहे असे वक्तव्य जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आज 10 जुलै रोजी संभाव्य पूरपरिस्थिती असलेल्या गोंदिया तालुक्यातील गावांची पाहणी दरम्यान उपस्थित नागरिकांना केले.

जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरु झाली असून जिल्ह्यात गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सून कालावधीच्या सुरुवातीलाच गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. म्हणून जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी पूरप्रवण गावांची भौगोलिक परिस्थिती पाहण्याकरिता बिरसोला, भदयाटोला, कासा, पुजारीटोला, मरारटोला, ब्राम्हणटोला व काटी या गावांना भेट देवून मान्सून पुर्वतयारीच्या अनुषंगाने केलेले नियोजन व भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत अप्पर तहसिलदार अनिल खडतकर, नायब तहसिलदार जी.पी. शिंगाडे, पूर नियंत्रण अधिकारी रमेश मेश्राम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, रावणवाडी पोलीस निरीक्षक उमेश पाटील, मंडळ अधिकारी एन.बी.वर्मा व डी.एच.पोरचेट्टीवार, तलाठी जी.पी.सोनवाने व ए.एल.वालोदे उपस्थित होते.

जिल्ह्यात मागीलवर्षी 2020 मध्ये ऑगष्ट महिन्यात गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान पूरपरिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानी तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचे, घर, गोठे व जनावरे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या यावर्षी सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी प्रत्यक्ष पूरप्रवण गावांना भेट देऊन तेथील भौगोलिक परिस्थिती व पूर येण्याची कारणे तसेच शोध व बचाव करण्याकरीता प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून यावेळी घेतली.

वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व त्यातील खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान तसेच वेळेवर शासनाकडून तात्काळ मदत देण्याकरीता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादीबाबत जिल्हाधिकारी यांनी विस्तृत माहिती घेतली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधून त्यांच्यादेखील समस्या जाणून घेतल्या. सदर भागात पूल व रस्त्यांची उंची कमी असल्यामुळे पूरपरिस्थितीच्या वेळेस एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क पूर्णपणे तुटतो. म्हणून या भागात असलेल्या पुलांची व रस्त्यांची उंची वाढविण्यासाठी गावकऱ्यांनी विनंती केली. उन्हाळी पीक घेण्यासाठी सदर भागात पाणी पुरविण्याकरीता विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सुद्धा यावेळी गावकऱ्यांनी मागणी केली.

यावेळी बिरसोला गावचे सरपंच सरोजीनी दांदळे, उपसरपंच देवलाल जंभरे, पोलीस पाटील दिलीप तुरकर, कासा गावचे सरपंच कृष्णी मरठे, पोलीस पाटील रमेश येसने, कोतवाल पिंटू बागडे व इतर नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

*चौकटीत*
*जिल्हाधिकाऱ्यांनी केला त्या आजीचा सत्कार…*
गोंदिया तालुक्यातील मरारटोला या गावातील जमरे कुटूंब यांचे निवास अत्यंत खोलगट भागात असून दरवर्षी पूरपरिस्थितीमध्ये पुराचे पाणी त्यांच्या घरात शिरते. त्यामुळे सदर कुटूंबियांना दरवर्षी सुरक्षीत स्थळी हलविण्यात येते. सदर कुटूंब संयुक्त कुटूंब पध्दतीने सहवास करीत असून कुटूंबातील सदस्यांची संख्या 44 एवढी आहे. या कुटूंबातील प्रमुख 85 वर्षाची वयोवृध्द आजी श्रीमती कारीबाई रामचंद जमरे यांनी मागीलवर्षी उदभवलेल्या पूरपरिस्थितीवर मात करुन कुटूंबियांचे व स्वत:चे संरक्षण केल्यामुळे जिल्हाधिकारी खवले यांनी त्या आजीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

*आपत्ती दरम्यान प्रशासनाननागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवावे- जिल्हाधिकारी यांचे आवाहन*

पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सज्ज आहे. प्रशासन व नागरिक हे समाजातील घटकाचे दोन बाजू आहेत, अश्या परिस्थितीत आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन पूर परिस्थिती पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी उपस्थित नागरिकांना केले.

 

blank