
– नवज्योतसिंग सिद्धू पंजाबचे अध्यक्ष
– सोनिया गांधी-प्रियांका वढेरांच्या बैठकीत झाला निर्णय
नवी दिल्ली-काँग्रेस पक्षात लवकरच मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता असून, विधानसभा निवडणूक होणार असलेल्या पंजाबमधील अंतर्गत वाद सोडविण्यासाठी नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.
10 जनपथवरून फोन आल्यानंतर कमलनाथ यांनी गुरुवारी सकाळी तातडीने दिल्ली गाठली. पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी आणि महासचिव प्रियांका वढेरा यांच्यासोबत त्यांनी सुमारे दीड तास चर्चा केली. या बैठकीत कमलनाथ यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. कमलनाथ यांना हंगामी अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. इतकेच नव्हे, तर नजीकच्या काळात नव्या अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया देखील सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी लवकरच काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावणार आहेत. यानंतर पक्षात व्यापक फेरबदल केले जाणार आहेत. या प्रक्रियेनंतर ऑगस्ट महिन्यात अ. भा. काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात कमलनाथ यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते, असे सूत्रांचे मत आहे.
कोषाध्यक्ष होण्यास दिला नकार
या बैठकीत कमलनाथ यांना कोषाध्यक्ष पदाचा प्रस्ताव देण्यात आला होता, पण त्यांनी या पदासाठी नकार दिला. आपल्याला पक्षात मोठी जबाबदारी पार पाडायची आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांची ही भूमिका मान्य करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंजाबमधील वादावर तोडगा
निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या पंजाबमधील वादावरही या बैठकीत तोडगा काढण्यात आला असल्याचे समजते. नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याचा आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.





