
– जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत चौकशीचे निर्देश
गोंदिया : जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतीमधून प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधी संदर्भात घोळ झाल्याचा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. प्रथमदर्शनी चौकशीतून हे समोर आले आहे. ज्यामध्ये आयडीनुसार ज्या लाभार्थ्यांना लाभ द्यायचे होते त्यांना लाभ न देता दुसऱ्याच व्यक्तीला लाभ देण्यात आल्याचे समोर आले आहे. पेन्शनर्संना लाभ देण्यात आले आहे. काही बाबतीत आयडी एकाची, मंजूर यादीत नाव दुसऱ्याचे तर लाभ तिसऱ्यालाच मिळाला आहे. लाभ घेवून बांधकाम न करणारे प्रकरण, एकाच व्यक्तीला दोन वेळा लाभ देण्याचे प्रकरण घडलेले आहेत. वर्ष २०१८-१९ मध्ये असे बरेच प्रकरण घडले आहे. या प्रकरणी घोळ समोर आणण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील अधिक लाभार्थी असलेल्या ५ ग्राम पंचायतींची निवड करून सखोल चौकशी करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेत अफरातफर करणाऱ्यांची गय केली जाणार नसून या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश खा.सुनिल मेंढे यांनी दिले.
ते रविवार, १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी नयना गुंडे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, न.प.मुख्याधिकारी करण चौहान, सर्व खंडविकास अधिकारी, तिरोडा कृउबास सभापती चिंतामन रहांगडाले, भाजप जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, जयंत शुक्ला, गुड्डू कारडा, गोल्डी गावंडे, विनोद चांदवानी, अशोक जयसिंघानी, तिजेश गौतम आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना खा.मेंढे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेची कामे वेगाने व्हावी, याकरीता येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात यावे. यासोबतच जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पासपोर्ट कार्यालयाचे काम थांबून आहे. त्यातील अडचणी दूर करून त्वरित सुरू करण्यात यावे, जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेशी संबधित असलेल्या विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात यावा, जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यासंदर्भात कापण्यात आलेल्या झाडांच्या बाबतीत चौकशी करावी, सिंधी समाजातील पट्टे वाटपामध्ये भुखंडच्या आखिव पत्रिकेसंदर्भातील प्रकरण सोडविण्यात यावे आदि विषयांवर चर्चा करून संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले.





