
भंडारा,दि.23 : गेल्या ३ दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस बरसतो आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अशातच गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही सतत पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाचे ३३ पैकी १९ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. काल सकाळपासून आत्तापर्यंत धरणाने तिसऱ्यांदा स्थिती बदलली आहे. आजही पूर्व आणि पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे गोसीखुर्दचे आणखी काही दरवाजे उघडले जातील, अशी शक्यता वर्तविली गेली आहे.
आज सकाळी ६ वाजता ३ दरवाजे, ८ वाजता ७ आणि १० वाजता १२ दरवाजे, असे एकूण १९ दरवाजे आत्तापर्यंत उघडण्यात आले आहेत. गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, नागपूर, मध्यप्रदेशातील मंडला, बालाघाट, शिवणी, बैतुल, छिंदवाडा आणि छत्तीसगडमधील राजनांदगाव यांचा समावेश आहे. तीन राज्यांतील ९ जिल्ह्यांत सतत पाऊस सुरू असल्यामुळे धरण भरले. आज सकाळपासून तिसऱ्यांदा स्थिती बदलली आहे. या पावसाळ्यात दुसऱ्यांदा ही स्थिती आली असल्याचे गोसीखुर्द प्रशासनाने सांगितले.





