
सडक अर्जुनी,दि.25ः-शेतकरी हा अन्नदाता असून बँकांनी त्यांचा सन्मान राखून आदरपूर्वक वागणूक द्यावी. कर्जदार समजून त्यांची अव्हेलना करू नये. तालुक्याचे पीककर्ज उद्दिष्ट अल्प असून पुढील हंगामात उद्दिष्ट वाढविण्यात यावे. शेतकर्यांना जास्तीतजास्त क्रेडिट कार्ड देऊन कर्ज मंजूर करताना अडथळे न देता कर्ज मंजूर करावे, असे निर्देश आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिले.
ते 23 जुलै रोजी येथे आयोजित राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या पीककर्ज वाटप आढावा घेताना बोलत होते. यावेळी आ. चंद्रिकापुरे यांनी, देना बँकेचे विलीनीकरण झाले असल्याने बँकेचे आयएफसी कोड व खाते क्र.बदल झाल्याने त्या बँकेत खाते असलेल्या शेतकर्यांचे अपडेट करून शेतकर्यांना लवकर बोनसची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले दरम्यान आतापर्यंत तालुक्यातील शेतकर्यांना स्टेट बँकेने 135 लाभार्थ्यांना 0.85 कोटी, बँक ऑफ बडोदाने 1.10 कोटी, विदर्भ कोंकण ग्रामिण बँक पांढरीने 68 लाभार्थ्यांना 0.42 कोटी, सडक अर्जुनी शाखेने 140 खातेदारांना 1.10 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र सौंडदने 127 लाभार्थ्यांना 0.81 कोटी, जिल्हा सहकारी बँकेने 3972 लाभार्थ्यांना 17.29 कोटीचे हंगामी पीक कर्ज शेतकर्यांना वाटप झाल्याचे संबंधित बँक व्यवस्थापकांनी सांगितले. पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 82 एवढी आहे.
तालुक्यात एकूण 26000 खातेदार असून 4442 लाभार्थ्यांना 21.57 कोटी रुपये पीक कर्ज वाटप झालेले आहे. यावेळी उपस्थित बँक व्यवस्थापकांनी शेतकर्यांना ड्रिप संच, ट्रॅक्टर, रोटावेटर, शेडनेट हाऊस, पोहा मिल, पंपसेट, राईस मिल इत्यादी बाबी करिता कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला तहसिलदार उषा चौधरी, नायब तहसीलदार रमेश खोकले, तालुक्यातील बँकेचे व्यवस्थापक, एफआरटी शहा, कृष्णा ठलाल आदी उपस्थित होते.





