
,बटाणा शिवारातील घटना,
गोंदिया ता. 26 — शेतात धान रोवणी करीत असताना महिला शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला केल्याने एक महिला शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी(ता.25) सकाळी दहा च्या सुमारास गोंदिया तालुक्यातील वटाणा या गावात घडली असून कचरा बाई दिना कुंभरे असे जखमी झालेल्या महिला शेतकऱ्याचे नाव आहे.
कचराबाई ही सकाळी आपल्या शेतात धानाची रोवणी करण्या करिता गेली असता अचानक झुडपात लपून बसलेल्या रानडुकराने अचानक तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या पायाला जबर मार लागला असून तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे कामे सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग शेतशिवारात वावरत आहेत. अशात जंगली डुक्करा कडून होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून वन विभागाने या रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच जखमी झालेल्या महिला शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बटाणा येथील नागरिकांनी वनविभागाकडे लावून धरली आहे.




