33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गजानन महाराज संस्थानाचे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक

गजानन महाराज संस्थानाचे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक

0
41

blank

मुंबई, दि. 4 : – शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचिताची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील अशा पण सत्य आहेत.श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते.शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते.महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

खासदार प्रतापराव जाधव--माझे मार्गदर्शक गुरुवर्य श्री गजानन महाराज संस्थान,शेगाव चे अध्यक्ष आदरणीय श्री. शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता मनाला चटका लावुन गेली. एका निष्काम,निःस्वार्थ, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वासोबत लोकल्याण हे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मानून शेवटच्या श्वासापर्यंत श्री संत गजानन महाराज संस्थान चा कारभार अत्यंत पारदर्शी,भक्ता भिमुख सेवा,सुविधा साठी,त्यांच्या मानव सेवेसाठी सदैव स्मरणात राहतील यात शंका नाही…त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!!

blank