
भंडारा : ज्या सुवर्ण दिवसाची मोठ्या आतुरतेने भंडारा जिल्हातील लोक वाट बघत होते, तो क्षण अखेर ५ महिन्यांच्या दीर्घ संघर्षानंतर आला आहे. आज भंडारा जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढून कोरोनामुक्त झाला आहे.
एक एप्रिलला आलेल्या दुसऱ्या लाटेने भंडारा जिल्हा अक्षरशः हादरुन गेला होता. भंडाऱ्यात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने तब्बल ४१ हजार ४३१ लोक संक्रमित झाले होते. तर कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत तब्बल ७८९ लोकांचा बळी गेला आहे.
भंडाऱ्यात लोकांची बळी जाणारी संख्या लक्षात घेता आधीच मध्ये सरण रचून ठेवण्याची नामुश्की जिल्हा प्रशासनावर आली होती. मात्र हा संघर्ष करत आज अखेर भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तर जिल्ह्यात आता एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ८०९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद असून आता सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ११३३ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे हा हाहाकार बघता जिल्हावासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.





