दुकान गाळ्यांचे वाटप करा….! मनसे ची मागणी

0
18

▪️ अन्यथा प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडणार

सालेकसा–पंचायत समिती सालेकसाच्या आवारात मुख्य मार्गालगत तालुक्यातील व्यवसायीकांसाठी व्यवसाय करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून पक्या दुकान गाड्यांचे बांधकाम मागील दोन वर्षे आधी करण्यात आले. मात्र मागील दोन वर्षापासून दुकान गाड्यांची वाटप करण्याची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. त्यामुळे बांधलेली दुकान गाळे ही शोभेची वस्तू आहे का ? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या बाबीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा च्या वतीने दुकान गाळ्यांचे वाटप करा असे निवेदन मनसेच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी जि. प. गोंदिया यांना देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांचे एकजुटीने पंचायत विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातून प्रशासनाला चेतविण्यात आले.
सविस्तर असे की, स्थानिक व्यवसायिकांना तसेच नव्याने व्यवसाय करण्याची जिज्ञासा बाळगणार्‍या नागरिकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्या अनुषंगाने तत्कालीन जि. प. अध्यक्ष सीमाताई मडावी यांच्या अध्यक्षतेखाली दुकानगाडे वाटप करण्यासाठी समिती तयार करण्यात आली. तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये नव्याने बनलेल्या दुकान गाड्यांच्या वाटपासाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते. आलेल्या अर्जांचे लॉटरी पद्धतीने निवड करून दुकान गाड्यांचे वाटप करण्यात आले होते. मात्र सालेकसा तालुक्यात पाच दुकान गाळे बनविण्यात आले असता त्यातील फक्त दोनच दुकान गाड्यांचे वाटप करण्यात आले व उर्वरित तीन दुकान गाड्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागील दोन वर्षापासून जनहितार्थ जिल्हा परिषद गोंदियाकडे पाठपुरावा केला असता अजूनही निद्रस्त प्रशासनाकडून कुठलीही योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. केलेली मागणी वेळेत पूर्ण करण्यात आली नाही तर स्थानिक नागरिक व मनसेच्या वतीने प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी भूमिका संबंधितांनी दर्शविलेली आहे.

दुकानगाडे वाटप करण्याची प्रक्रिया जिल्हा स्तरावरून करण्यात येत असते. त्या संदर्भात जि.प. ला आम्ही पाठपुरावा करू….एस. टी. तुरकर
गटविकास अधिकारी, सालेकसा

“ज्या ठिकाणी दुकानगाडे बनविण्यात आले त्या ठिकाणी नागरिकांचे दुकान होते. स्थानिक भूमीपुत्रांचे रोजगार हिसकावून दुकान गाडे बांधकाम करण्यात आले आणि आता त्यांना त्यांचा हक्काचे दुकान गाडे वाटप न करून त्यांच्यावर अन्याय केले जात आहे.”
…राहुल हटवार,मनसे शहर अध्यक्ष, सालेकसा