
अर्जुनी-मोरगाव: कर्जाने त्रस्त होवून शेतकरी आत्महत्या होण्याच्या घटना घडतच आहे. हे चक्र कधी थांबेल, हे कळायला मार्ग नाही. आता पुन्हा तालुक्याच्या ग्राम केशोरी येथे कर्जाच्या त्रासाने वैतागून विष सेवन करून एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे. संतोष दयाराम मानकर (वय 45) रा. केशोरी असे त्या मृत शेतकर्याचे नाव आहे. ही घटना 9 ते 10 ऑगस्ट दरम्यान घडली.
सविस्तर असे की, ग्राम केशोरी येथील शेतकरी संतोष दयाराम मानकर यांच्या डोक्यावर कर्जाचे मोठे ओझे होते. त्यामुळे त्रस्त होवून 9 ऑगस्ट रोजी त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान 10 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक शेतकर्यावर खासगी फायनान्स कंपनी महिंद्रा फायनान्स बँकेचे जवळपास 8 ते 9 लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच त्यांनी आदिवासी सोसायटीमधून 1 ते 2 लाख रुपयांचे कर्ज पाइप लाइन व पीक कर्जापोटी घेतले होते. त्यामुळे त्रस्त होवून विष सेवन करून शेतकर्याने आत्महत्या केली.
मृतकाच्या कुटुंबात पत्नी, तीन मुली व एक मुलगा आहे. सदर घटनेची नोंद केशोरी पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.





