
आमगावात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
महोत्सवात २० पेक्षा अधिक रानभाज्या चा समावेश
आमगाव,दि.14 ;-जागतिक आदिवासी दिना निमित्ताने ९ ते १५ दरम्यान रानभाजी महोत्सवचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने आमगाव तालुक्यात १४ ऑगस्ट ला तालुका कृषी विभागाच्या आवारात रानभाजी महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले होते.
आहारातून दूर्मिळ होत चाललेल्या औषधीयुक्त रानभाज्यांची पुन्हा एकदा ओळख व्हावी, त्यांचा आहारात समावेश व्हावा, तसेच त्यातून शेतकरी व आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा, या उद्देशाने शहरात रानभाजी महोत्सवाचे शनिवारी (दि. १४) आयोजन करण्यात आले होते. येथील कृषी विभागाच्या कार्यालयासमोर महोत्सव थाटात पार पडला. तालुका कृषि विभाग व ‘आत्मा’च्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी महोत्सवाचे उदघाटन सौ छबु ताई उके, माजी पंचायत समिती सदस्या व तालुका शेतकरी सल्लागार समिती सदस्य ह्या होत्या तर कार्यक्रमचे अध्यक्ष संतोष पारधी कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी हे होते . प्रमुख अतिथी म्हणून आमगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष – ईसुलाल भालेकर, एस एस भगत, सौ आशा दखने, सूरज जाधव तालुका कृषी अधिकारी, पी पी मुंढे, मंडळ कृषी अधिकारी मंचावर उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी तालुक्यातील आदिवासी व शेतकरी बांधवांकडून रानभाज्या चे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. उपस्थितांना रानभाज्यांविषयी माहिती देत त्यांचे औषधीयुक्त गुणधर्मांची माहिती देण्यात आली. महोत्सवात काटवल, कुडवा सेंगा, पाथर, घोळ, अंबाडी भाजी. शेवगा,( मुंगना ) कुर्डु, गुळवेल, आवळा, तरोटा, गवती चहा, रानओवा, सुरण, पातूर, मोहफुलें, करवंद, उंदिरकान, मटारु, अळू, बांबूवास्टे आदींसह इतर विविध २० पेक्षा अधिक रानभाज्या, वनस्पतींची प्रदर्शन व विक्री या वेळी करण्यात आली. ‘शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करू प्रयत्न’
रान भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
निसर्गामध्ये उपलब्ध रानभाज्या व फळांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व तसेच सद्यपरिस्थितीमध्ये जंगलातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्त्व व आरोग्य विषयक माहिती संतोष पारधी यांनी अध्यक्षीय भाषणात नागरिकांना सांगितले.
कोरोनाशी लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून, त्यांच्या आहारात समावेश केल्याने आरोग्य संपन्न राहता येईल, असे मत उद्घाटक छबुताई उके यांनी व्यक्त केले.या प्रसंगी तालुका कृषी विभागाचे आत्मा बीटीएम कु एस के शिवणकर यांनी कार्यक्रमाचे संचालन तर आर पी सेंगर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.





