37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मोहरमच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी

मोहरमच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी

0
33

वाशिम, दि. १5) : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लीम बांधवांतर्फे वाझ, मजलीस तसेच मातम मिरवणूका आयोजित करण्यात येतात. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण, अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमही साध्या पद्धतीने करण्याबाबत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १३ ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वये मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या आदेशानुसार मोहरम महिन्यात ९ व्या दिवशी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी ‘कत्ल की रात’ आणि १० व्या दिवशी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी ‘योम-ए-आशुरा’ येत आहे. या निमित्ताने मातम मिरवणूका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूका काढण्यात येवू नयेत. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम, दुखवटा करु नये.

वाझ, मजलीसचा हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया, आलम काढू नयेत. सबील छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सदर ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.

राज्य शासनाच्या ४ जून, १७ जून, २५ जूनतसेच २ ऑगस्ट रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनानुसार इतर निर्बंध कायम राहतील. या परिपत्रकांमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्यामध्ये मोहरम निमित कोणतीही शिथिलता देता येणार अन्ही. कोविड-१९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

blank