30.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त- पालकमंत्री नवाब मलिक

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त- पालकमंत्री नवाब मलिक

0
42

• जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

गोंदिया,दि.16: रोजच्या सकस आहारामध्ये मानवाच्या इम्यूनिटी वाढीसाठी रानभाज्यांचे महत्व
अनन्यसाधारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त असून आहारात समावेश केल्याने
आरोग्यसंपन्न राहता येईल. असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने नविन
प्रशासकीय इमारत गोंदिया येथे 15 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी श्री मलिक बोलत होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी नयना गुंडे,
पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गणेश
घोरपडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री मलिक पुढे म्हणाले, रानभाज्यांमध्ये पोषक तत्व असल्यामुळे त्यांचे आहारशास्त्रीय महत्व आहे.
रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बचतगटामार्फत उत्पादन वाढीसाठी कृषि विभागाने विशेष लक्ष
देण्याची गरज आहे. रानभाजी महोत्सवातून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या महोत्सवाच्या
माध्यमातून परंपरागत उगवणाऱ्या रानभाज्यांची शहरातील व ग्रामीण भागातील लोकांना माहिती व्हावी हा या
महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. रानभाज्यांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले आहे. त्यामुळे रानभाज्यांची
उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे यांनी केले. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात
रानभाजी महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट 2021 या
कालावधीत सर्वच तालुक्यांमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असे त्यांनी प्रास्ताविकातून
सांगितले.
या महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेद अंतर्गत जिल्ह्यातील बचतगटातील महिला तसेच
इतर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्याचप्रमाणे महोत्सवाला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. जिल्ह्याच्या
विविध भागांमधून अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण रानभाज्या महोत्सवाच्या ठिकाणी आणल्या होत्या.
यावेळी रानभाज्यांची माहिती पुस्तिकेचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच
ज्या शेतकऱ्यांनी व महिला बचतगटांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते
प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास तहसिलदार आदेश डफळ, अप्पर तहसिलदार अनिल खडतकर, कृषि उपसंचालक प्रणाली चव्हाण,
उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील, देवरी उपविभागीय कृषि अधिकारी मंगेश वावधने, माविमचे
जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, तंत्र अधिकारी कावेरी साळे उपस्थित होते.
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये जिल्ह्यातील कृषि विभागामार्फतचे शेतकरी, उमेद व महिला आर्थिक
विकास महामंडळ यांचे रानभाज्या विक्रीचे एकूण 65 स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये केना भाजी, आघाडा,
बारमाही लसून, कोचईचे पाने, बरमाराक्षसची पाने, सेवगा, सिल्लारी भाजी, आंबाडी भाजी, तरोटा भाजी, पातूर
भाजी, खापरखुटीची भाजी, उंदीरकानाची भाजी, हरदफरीची भाजी, कुंदरु, भूईआवळा, पदीना, कुड्याचे फुल व
कुड्याच्या शेंगा, केवकांदा, काटवल, करवंद, मटारु, कारले, घुया, सुरण, भूईलिंब, पानफुटी, गुळवेल, तेलपांढरा,
मशुरुम, भोंबोडी व इतर रानभाज्यांची विक्री करण्यात आली. महिला बचत गटामार्फत रानभाज्यापासून बनविलेल्या
खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. रानभाजी महोत्सवात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या
प्रमाणात रानभाज्यांची खरेदी केली. या महोत्सवाला शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनिल खडसे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक
शैलेश बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषि अधिकारी प्रशांत कल्लेवार व श्री नंदनवार, कृषि

पर्यवेक्षक श्री मेंढे, श्री टेंभूर्णे, कृषि सहाय्यक श्री दमाहे, श्री भानारकर, श्री लिल्हारे, श्रीमती मंडल, तुरकर, यादव,
भलावी, कुंदे, दाडगे, सुर्यवंशी व अनुरेखक मनोहर देविकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार
उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.