31.7 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ तुमसर तालुक्यातील माडगी येथील ‘मातोश्री पांदण रस्ता’ कामात मोठा डोलारा; मजुरांऐवजी जेसीबीचा...

तुमसर तालुक्यातील माडगी येथील ‘मातोश्री पांदण रस्ता’ कामात मोठा डोलारा; मजुरांऐवजी जेसीबीचा वापर, चौकशीची मागणी!

0
9

​तुमसर (भंडारा) : तालुक्यातील मौजा माडगी येथे ‘मातोश्री पांदण रस्ता’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमतता होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मजुरांना रोजगार देण्याऐवजी यंत्रसामग्रीचा सर्रास वापर केला जात असून, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत उप कार्यकारी अभियंता प्रफुल्ल झाडे (सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हापरिषद उपविभाग, तुमसर) यांच्याकडे रीतसर तक्रार मंगळवारी दाखल करण्यात आली.
​सदर माहितीनुसार, माडगी येथील विकास भोयर यांच्या घरापासून ते श्यामजी कांबळे यांच्या शेतापर्यंत पांदण रस्त्याचे काम सुरू आहे. ‘मनरेगा’च्या नियमांनुसार ग्रामीण भागातील मजुरांना हाताला काम मिळणे बंधनकारक असताना, या ठिकाणी मजुरांना डावलून जेसीबी व इतर यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांच्या मर्जीतील बोगस मजूर दाखवून, केवळ त्यांचे कामाच्या ठिकाणी फोटो काढले जातात आणि त्यांना घरी पाठवले जाते, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी तक्रारीत केला आहे. यामुळे स्थानिक व गरजू मजूर रोजगारापासून वंचित राहिले आहेत. याबाबत स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, बालचंद बोंद्रे, विठ्ठल डायरे, मुकेश कांबळे यांनी बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता प्रफुल्ल झाडे यांना निवेदन देण्यात आले.blank

​तांत्रिक निकषांना हरताळ; निकृष्ट कामाची शंका…
​मंजूर तांत्रिक निकषांनुसार पांदण रस्त्याच्या कामात सुरुवातीला ६ इंच जाडीचा मुरूम टाकून योग्य दबाई करणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुक्रमे ८० एमएम व ४० एमएम खडीचे फिलिंग करून दबाई व शेवटी घोटाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्ष कामावर या कोणत्याही तांत्रिक प्रक्रियेचे पालन केले जात नसल्याचे दिसत असून, रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

​अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष?
सदर कामाचे तांत्रिक पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी संबंधित शाखा अभियंता आणि तपासणीची जबाबदारी उपअभियंत्यांची आहे. मात्र, डोळ्यांदेखत नियम पायदळी तुडवले जात असतानाही संबंधित यंत्रणेकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे.
यामध्ये ​कामाची तात्काळ संयुक्त स्थळ पाहणी करण्यात यावी. ​’नरेगा’ अंतर्गत कामात यंत्रसामग्रीच्या वापराची सखोल चौकशी व्हावी. मंजूर अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका आणि प्रत्यक्ष कामाची पडताळणी करावी. कर्तव्यात कसूर करणाऱ्या शाखा अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी. ​चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ कामाला स्थगिती देण्यात यावी.
​या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन काय पावले उचलते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण माडगी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सदर कामाच्या देखरेख, मजुरांचे हजेरी घेणे व झालेल्या कामाचे फोटो काढण्याचे काम संबंधित ग्रामसेवक व रोजगार सेवकांचे असते मात्र मजुरांच्या जागी जेसीबी चालवून काम होत असेल तर याची चौकशी करून व देयके थांबून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
–प्रफुल्ल झाडे, उप कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पंचायत समिती तुमसर