
गोरेगाव,दि.02ःः तालुक्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणार्या कागदपत्रांवर दोन आठवड्यांपासून डिजिटल स्वाक्षरीच झाली नसल्याने विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोरेगाव तहसील कार्यालयात रखडली आहेत. कागदपत्रांसाठी विद्यार्थी तहसील कार्यालयाच्या चकरा मारत असल्याचे चित्र आहे. विशेषतः गोरेगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या डिजिटल स्वाक्षर्या अद्ययावतच झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यातच कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांची कामे रेंगाळली असून प्रशासनाची चूक आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधक ठरू लागली आहे.
गोरेगाव तहसील कार्यालयात चार नायब तहसीलदार नियुक्त आहेत. एका नायब तहसीलदारांचे स्थानांतरण करण्यात आले तर दुसर्या नायब तहसीलदारांना गोंदिया येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून ही समस्या निर्माण झाली आहे. सेतू संबंधित अनेक कामे रेंगाळलेली आहेत. सध्या शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना डोमेसिएल, उत्पन्नचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियल आदी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. परंतु गोरेगाव येथील अधिकार्यांची डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध नसल्यामुळे 13 ऑगस्टपासून त्यांचे कागदपत्र तहसील कार्यालयात अडून आहेत.
त्यामुळे विद्यार्थी चिंतेत सापडले आहेत. दररोज तहसील कार्यालयाच्या पायर्या झिजवताना दिसत आहेत. सद्यास्थितीत महाविद्यालयीन प्रवेशाच्या अंतिम तारखा जवळ आल्या असताना तहसील प्रशासनाकडून केवळ वेळ काढून नेत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. तहसील प्रशासनाकडून डिजिटल स्वाक्षर्या अद्ययावत करणे गरजेचे असताना तशी प्रक्रिया वेळेत करण्यात आली नाही. परिणामी तहसील प्रशासनाची चूक आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधक ठरली आहे.
विशेषतः गोरेगाव येथील तत्कालीन नायब तहसीलदार नरेश वेदी यांच्याकडे ही जबाबदारी सोपिवण्यात आली होती. वेदी यांची डिजिटल स्वाक्षरी अद्ययावत ही करण्यात आली होती. मात्र, त्यांचे सालेकसा येथे स्थानांतरण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी होऊ शकली नाही. ही बाब तहसीलदारांच्या लक्षात आणून देण्यात आली. मात्र, स्वाक्षरीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात प्रशासनाला यश आले नाही.