
भंडारा :- साकोली नगर परिषद अस्तित्वात आल्यापासुन शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक वसाहत नव्याने तयार झाल्याने तितक्याच मुलभुत सुविधा देण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून होत आहे. याच मुलभुत सुविधा अंतर्गत पाण्याची स्वतंत्र पाणी पुरवठा मंजुर करण्यात यावी. जेणेकरून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती न करता पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन नगरसेवकांनी ही अडचण आमदार डॉ परिणय फुके यांच्या निदर्शनास आणुन देवून पाणी पुरवठा योजना मंजुर करावी अशी मागणी केली होती. त्यानुषंगाने डॉ फुके यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना दि. २७/०५/२०२१ रोजी पत्र लिहुन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत साकोली नगरपरिषद पाणी पुरवठायोजना करीता निम्म चुलबंद बॅरेजमधुन पाणी मिळण्याकरीता आरक्षण द्यावे अशी मागणी केली.
सदर पाणी आरक्षणबाबतचा निर्णय हा कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांना असुन तशी परवानगी द्यावी असे सुचित केले. डॉ. फुके यांनी कार्यकारी संचालक मोहीते यांची भेट घेवून पाणीपुरवठा आरक्षणाच्या प्रस्तावावर चर्चा केली. कार्यकारी संचालक यांनी निन्न चुलबंद प्रकल्पातुन पाणी पुरवठा आरक्षण प्रस्तावाच्या मान्यतेचे पत्र फुके यांच्या समक्ष साकोली नगर परिषदेच्या अध्यक्षा धनवंता राऊत यांना दिले. लवकरच तांत्रिक मान्यता प्रदान करून काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. यावेळी न. प. उपाध्यक्ष जगन उईके, नगरसेवक रवि परशुरामकर, नगरसेवक मनिष कापगते, नगरसेवक पुरूषोत्तम कोटांगले, नगरसेवक हेमंत भारद्वाज, ईशव राऊत उपस्थित होते.





