
संतोष रोकडे/अर्जुनी-मोर,दि.23ः-अर्जुनी-मोर तालुका ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्यावतीने मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आज 23 सप्टेंबरला ठिय्या आंदोलन करुन पथदिवे सुरु करण्याची मागणी करण्यात आली.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे पथदिवे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत या संबंधाने तालुका सरपंच व उपसरपंच सेवा संघाच्या वतीने पथदिवे सुरू करण्यासाठी निवेदने देण्यात आली.विजेचे थकीत बिल शासनाने महावितरण कंपनीला अदा न केल्यामुळे महावितरण कंपनीने अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्रामपंचायत पथदिव्यांचा विजपुरवठा ऐन पावसाळ्यात व सणासुदीच्या काळात खंडित केल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.याविषयी राज्य सरकारसोबत लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंबंधी वारंवार निवेदने सादर करून पथदिवे सुरू करण्याची मागणी करण्यात आली.परंतु अजूनपर्यंत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले न गेल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आमदार चंद्रिकापूरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन भजन किर्तन करण्यात आले.पथदिवे सुरू होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेचे म्हणने आहे. अर्जुनी-मोर तालुका ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.हेमकृष्ण संग्रामे,सरचिटणीस अशोक कापगते यांनी या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षाचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाल्याची माहिती दिली.तसेच मागणी मान्य होईपर्यंत सदर आंदोलन सुरु राहील असा निर्धार व्यक्त केला.





