
तिरोडा पोलिसांची कारवाई
तिरोडा-तालुक्यातील खैरगाडी तलाव शिवारातील झुडपी जंगलात अवैधरित्या दारु गाळप होणार्या अड्डयावर तिरोडा पोलिसांनी धाड टाकून 5.35 लाखांचा अवैध दारुसाठी उद्धस्त केला. ही कारवाई आज, 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता करण्यात आली. तिरोडा-काचेवानी मार्गावर पोलिस पथक गस्तीवर असताना खैरबोडी तलावाशेजरील झुडपी जंगलात अवैधरित्या दारु गाळप होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचाना सोबत घेऊन धाड टाकली.
यावेळी दिलीप बरियेकर (35) रा.तिरोडा हा दारु गाळताना आढळला. पोलिसांनी पंचनामा करुन 22 हजार रुपयांची हातभट्टीची दारु, 4 लाख 86 हजार 400 रुपयांचा मोहफुड सडवा, 5 हजाराचा गूळ, 2400 रुपयांचे रसायन, 10 हजाराचे जळाऊ लाकडे व दारु गाळपासाठी अन्य साहित्य असे एकूण 5 लाख 35 हजाराचा दारुसाठा जप्त करुन त्याची विल्हेवाट लावली. आरोपीला अटक केली असून त्याच्यावर तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपनिरिक्षक राधा लाटे, सहायक पोलिस निरिक्षक पारधी, पोलिस शिपाई विदेश अंबुले, मनोज सपाटे यांनी केली.





