33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आठवडाभरात मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे

आठवडाभरात मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे

0
35

blank

* डव्वा – ढिमरटोली रेल्वे भूमिगत पुलाच्या मागणी संदर्भात धरणे आंदोलन
* आमदार विजय रहांगडाले यांच्यासह अनेकांची आंदोलनात उपस्थिती
* मागण्या पूर्ण न झाल्यास आठवडाभरानंतर पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा

गोंदिया – रेल्वे विभागाच्या सदोष बांधकामामुळे डव्वा – ढिमरटोली मार्गावरील रेल्वे च्या भूमिगत पुलाखालून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे ठरत असल्याने 2 ऑक्टोबर गांधी जयंती रोजी माजी सभापती चित्रकला चौधरी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन अखेर आठवड्यात मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्याने मागे घेण्यात आले.
गोंदिया – बल्लारशाह रेल्वे मार्गावरील डव्वा – ढिमरटोली रस्त्यावरील रेल्वे च्या भूमिगत पुलाचे बांधकाम सदोष झालेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पुलाच्या खाली तीन ते चार फुट पाणी साचून राहते. या संदर्भात समस्या निकाली काढण्यासाठी 9 ऑगस्ट 2016 रोजी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र रेल्वे अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. थातूरमातूर कारवाई केली मात्र मूळ समस्या सोडविण्यासाठी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे 8 मार्च 2020 रोजी मागण्यांच्या पूर्ततेसाठी माजी सभापती चित्रकला चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा धरणे आंदोलन करण्यात आले असता यावेळी ही ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या समक्ष तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र मूळ समस्या जैसे थे आहे. थोडासा पाऊस पडला तर या भूमिगत पुलाखालून प्रवास करणे अत्यंत जीवघेणा ठरत आहे. विशेष म्हणजे दोन चाकी व चार चाकी वाहने पुलाखालून जाऊ शकत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना तसेच गोरेगाव या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास मोठी अडचण डव्वा सह परिसरातील नागरिकांना होत आहे. रेल्वे विभाग केवळ पोकळ आश्वासन व थातूरमातूर कार्यवाही करून या परिसरातील नागरिकांचा विश्वासघात करीत असल्याने आज पुन्हा 2 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आमदार विजय रहांगडाले यांनी सहभागी होऊन रेल्वे अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. वारंवार आंदोलन करूनही मागण्या पूर्ण होत नाही याचा अर्थ काय. एका आठवड्यात मागणी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी रेल्वे अधिकार्‍यांना दिले. लगेच एडीएम जयस्वाल यांनी एका आठवड्यात मागणी वर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. यावेळी आमदार विजय रहांगडाले, माजी सभापती चित्रकला चौधरी यांच्यासह माजी आमदार हेमंत पटले, तहसिलदार गोस्वामी, डव्वा सरपंच माया कटरे, गणखैरा सरपंच धारा ताई तुप्पट, कवलेवाडा सरपंच शकुंतला कटरे, उप सरपंच पेमेंद्र कटरे, भाजप नेते दुर्गा ठाकरे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद पटले, संतोष रहांगडाले, जगदीश कटरे, डॉ. मोहन ठाकरे यांच्यासह डव्वा, कवलेवाडा, शहारवाणी येथील शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

blank