
गोंदिया,दि.4 : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषि अधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत
29 सप्टेंबरला कौशल्य आधारीत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम कासा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात घेण्यात
आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासा गावचे सरपंच कृष्णीताई मरठे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून
तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनिल खडसे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक
शैलेश बिसेन, कृषि सहाय्यक संगिता दाडगे, कासा गावचे उपसरपंच मोहपत खरे तसेच ग्रामपंचायत सदस्य भारत
पाचे व गीता पाचे उपस्थित होते.
यावेळी धनराज तुमडाम यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, कृषि विभागाची यांत्रिकीकरण
योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना व कृषि विभागाच्या विविध
योजनांवर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
सुनिल खडसे यांनी किटकनाशक विषाक्ततेच्या श्रेणीची ओळख चिन्हे व फवारणी करतांना काळजी न
घेतल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, किटकनाशकाची फवारणी कशी करावी
व किटकनाशक फवारतांना पी.पी.ई. किटचा वापर कसा करावा व एकात्मिक किड व्यवस्थापन यावर सविस्तर
मार्गदर्शन केले. तसेच कासा गाव परिसरात केशोरी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात करावी, जेणेकरुन प्रधानमंत्री
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उभारलेल्या मिरची पावडर प्रक्रिया उद्योगाला लाल मिरचीचा पुरवठा करता
येईल व शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
संगिता दाडगे यांनी तुडतुडा पिकावरील जैविक किटकनाशक मेटारायझियम कसे तयार करावे व त्याचा
वापर कसा करावा याबद्दल शेतकऱ्यांना विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि मित्र सत्यनारायण खरे व नंदलाल चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला
कासा, पुजारीटोला व ब्राम्हणटोला येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन
उपस्थितांचे आभार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश बिसेन यांनी मानले.





