
2 लाख 89 हजार 606 रुपयाचा मुद्देमाल जप्त
भंडारा-जिल्ह्यात पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनखाली ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. त्यांतर्गत पोलिसांच्या नजरेआड चालत असलेल्या अवैध धंद्यावर ठिकठिकाणी कारवाई करून 2 लाख 89 हजार 606 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भंडारा पोलिस स्टेशन अंतर्गत कलम 379 च्या गुन्हा दाखल असलेल्या एका प्रकरणात कारवाई करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याने मोटारसायकलचा गुन्हा कबूल केला. आरोपीच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल क्रमांक एमएच 36 डब्लू 8665 ही जप्त करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 68 गुंड प्रवृत्तीच्या आरोपींची चौकशी करण्यात आली. यावेळी एका फरार आरोपीलाही अटक करण्यास यश आले. तर शिक्षा सुनावण्यात आलेल्या 31 आरोपींचीही तपासणी करण्यात आली. मोटारवाहन कायद्यांतर्गत 11 गुन्हे करण्यात आले. तर दारूबंदी कायद्यांतर्गत 32 गुन्हे दाखल करून 1 लाख 24 हजार 330 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. जुगार कायद्यांतर्गत 5 गुन्हे दाखल करून 1 लाख 65 हजार 276 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व कारवायातंर्गत जप्त मालाची एकूण 2 लाख 49 हजार 606 रुपये आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह सर्व तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.





