
भ्रष्टाचाराचा कळस : दोषी सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कनिष्ठ अभियंता मनरेगा, कनिष्ठ अभियंता आवास योजना यांच्यावर कारवाई करा
-
अन्यथा येत्या आठ दिवसांत गोंदिया पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा
गोंदिया, दि.6 : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवटोला-पिपरटोला ग्रामपंचायतने शासकीय निधीच्या कामात भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे केली आहे. तसेच यातील दोषी पदाधिकारी, अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाईची मागणी केली असून कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला आहे.
देवटोला-पिपरटोला या ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत शाळा सपाटीकरण (पिपरटोला), आखर सपाटीकरण, देवटोला प्राथमिक शाळा ग्राऊंड सपाटीकरण, अंगणवाडी परिसर सपाटीकरण, बिजईटोला मंदिराजवळ ग्राऊंड सपाटीकरणाचे काम स्वतः सरपंच रामेश्वर हरिणखेडे यांनी जेसीपी व टँकर लावून केले. तसेच वैयक्तिक लाभार्थी योजनेतून जनावरांना बांधण्यासाठी गोठा, शोष खड्डे गावात तयार केले आहेत. त्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.सपाटीकरण हे मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. पण सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व कनिष्ठ अभियंता (मनरेगा) यांची साठगाठ असल्याने मंजुराऐवजी जेसीपी व टँक्टर लावून काम केले. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला गेला.
त्यांनी आपल्या जवळचे, घरातील बाहेरगावी गेलेले कुंटुब यांच्या नावाची डिमांड टाकून मस्टर मजुरांची म्हणून पंचायत समिती गोंदिया येथून काढण्यात आले. बोगस हजेरीपट दाखवून लाखो रुपये काढण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे गुरेढोरे नाहीत त्यांना गोठ्यांचा लाभ देण्यात आला. तोडून त्याच ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल तयार करण्यात आले आहे. एकाच कुटुंबात दुहेरी व तिहेरी सुद्धा लाभ देण्यात आला आहे.
जुन्या घरांना रंगरंगोटी करून दाखविले घरकुल
- गावात जे कुंटुब श्रीमंत आहेत त्यांचे नाव घरकुल योजनेत समाविष्ट आहेत. घरकुल तयार न करता जुने सिमेंटच्या घरांना रंगरंगोटी करुन देण्यात आली. त्याच घरांना नवीन घर दर्शवून त्यांचे देयक श्रीमंत लोकांना देण्यात आले.
- त्यात सुखराम बनकर, महेश कोठिराम कांबळे, कुष्णकुमार टेंभरे, हेमराज रामाजी हरिणखेडे, हुमराज रामाजी हरिणखेडे, विमल दशरथ ठाकरे, परमानंद डोमाजी हरिणखेडे यांचा समावेश आहे. यांचे बोगस घरकुल असून बोगस हजेरीपत्रक काढून लाभ देण्यात आले.
- यात ग्रामसेवक जवाबदार सहकारी कर्मचारी असून, कनिष्ठ अभियंता, रोजगार सेवक, सरपंच यांची मोठी साठगाठ आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण करण्यात आले.
चौकशीदरम्यान दारू पाजून करवला गोंधळ
याबाबत गावातील नागरिकांनी सरपंच, ग्रामसेवक, चौकशी अधिकारी यांना विचारणा केली. मात्र संरपच यांनी आपल्या जवळच्या हितसंबंधींना दारू पाजून ग्रामपंचायतमध्ये चौकशी दरम्यान गोंधळ करवून घेतला. त्यामुळे चौकशी अधिकारी चौकशी न करता निघून गेले.
भ्रष्टाचाराचा कळस : अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही
गोठ्याच्या कामासाठी प्रत्येक लाभार्थीकडून दहा ते पंधरा हजार रुपये घेण्यात आले. घरकुल लाभार्थीकडून अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही या धर्तीवर काम केले. अशी तक्रार ओंकार रेखलाल उपवंशी, मुन्नालाल रूपचंद उपवंशी, योगराज उपवंशी व गावातील इतर 27 नागरिकांनी जिल्हाधिकारी, दिलीप वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना केली आहे.
चौकशी न करता गैरकारभाराला प्रोत्साहन
ग्रामपंचायत देवटोला येथे अनेक कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला आहे. खंड विकास अधिकारी यांना लेखी व तोंडी तक्रार करण्यात आली. मात्र आपल्या संबंधित कर्मचार्यांना वाचवण्यासाठी चौकशी न करता उलट गैरकारभाराला प्रोत्साहन देतात.येत्या आठ दिवसांत भ्रष्टाचाराचा कळस गाठण्यास कारणीभूत संबंधित दोषी सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कनिष्ठ अभियंता मनरेगा, कनिष्ठ अभियंता आवास योजना यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणावर बसू. दरम्यान गावात काही घटना घडल्यास संबंधित अधिकारी व प्रशासन जवाबदार राहील. असा इशारा तक्रारदार ग्रामस्थांनी दिला आहे. संबंधित दोषींवर योग्य कारवाई वरिष्ठ अधिकार्यांनी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





