
गोंदिया, दि.8 : 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मेरा युवा भारत आणि अश्वमेध अथलेटिक्स अकादमी गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथील भद्रीटोला प्रशिक्षण मैदानावर जागतिक पर्यावरण दिनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मेरा युवा भारत गोंदियाचे उपनिदेशक सौरभकुमार निषाद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी स्वयंसेवक पुनम दमाहे व जागृत सेलोकर यांच्या नेतृत्यात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय सेनेतील जवान कलश नंदकिशोर चौधरी तसेच राष्ट्रीय पदक विजेत्या अॅथलीट लीना कोहडे उपस्थित होत्या.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करत युवकांना निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वेदांत मेश्राम यांनी प्रथम, कीर्ती ढेकवार यांनी द्वितीय तर मानसी पटले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांचा सत्कार करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
स्पर्धेनंतर भद्रीटोला मैदान परिसरातील विविध ठिकाणी खेळाडू व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. खेळाडूंना संबोधित करताना अॅथलेटिक्स प्रशिक्षक जागृत सेलोकर यांनी पर्यावरण संरक्षण हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देशातील प्रत्येक नागरिकाने हा संकल्प स्वीकारल्यास दरवर्षी कोट्यवधी नवीन वृक्षांची लागवड होऊ शकते आणि पर्यावरण संरक्षणाला नवी दिशा मिळू शकते असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान सर्व खेळाडूंना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली. त्यांनी आपल्या वाढदिवशी किमान एक झाड लावण्याचा तसेच त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता चौधरी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार देवश्री मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बादल कतरे व प्रतिक रहांगडाले यांचे विशेष सहकार्य व योगदान लाभले. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती आणि अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





