35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता बहिणीचे दागिने भावानेच चोरले,सात तासांत पोलिसांनी केली आरोपीला अटक

बहिणीचे दागिने भावानेच चोरले,सात तासांत पोलिसांनी केली आरोपीला अटक

0
71

blank

तिरोडा : बहिणीचे दागिने भावानेच चोरी केल्याची घटना तालुक्यातील मेंदिपूर येथे उघड झाली. माया संतोष तायवाडे हिचे दागिने भावानेच लंपास केले होते. या प्रकरणी महिलेने तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी सात तासांत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विलास दीपिक कुचेकर (वय 30) असे आरोपी भावाचे नाव आहे.

मेहंदीपूर येथील माया संतोष तायवाडे हिचे पती मरण पावल्यामुळे ती आपल्या मुलीसह वडिलांच्या घरी राहत होती. दरम्यान, तिचा भाऊ विलास दीपिक कुचेकर याच्याशी वाद झाल्यामुळे ती भिवापूर येथे मुलीसह नातलगाकडे राहण्यास गेली. वडिलांच्या घराशेजारी तिच्या घरकुलाचे काम सुरू असल्याने ती आपल्या घराचे बांधकाम पाहण्यासाठी आली. बांधकामासाठी लागणार्‍या साहित्याकरिता पैशाची गरज असल्याने तिने आपल्या आईच्या घरी ठेवलेल्या दागिन्यांची पिशवी घेतली.

मात्र, त्यातील सोन्याचे दोन नथ, एक अंगठी, नाकातील खडा, कानातील बिड्या, चांदीचे पायल एक जोडी, एक चेन, दोन अंगठ्या असा एकूण 57 हजारांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे समजले. काही दिवसांनी बहिणीचे दागिने तिच्या भावानेच दागिने चोरल्याचे कळले. मायाने दागिने परत मागितले असता दागिने मी चोरले, परंतु तुला परत करू शकत नाही, असे म्हटले. तसेच मुलीला ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी तिने 9 ऑक्टोबर रोजी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विलास दीपिक कुचेकर याला सहा तासांत अटक करून 57 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 12 ऑक्टोबरपर्यन्त पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार भाटीया, बरवैया, शैलेश दमाहे करीत आहेत.

blank