
गोंदिया-जिल्ह्यातील आमगाव पोलिस ठाणे हद्दीत चांदनी दिनेश पाथोडे, (11 ) रा. गोरठा ही विद्यार्थिनी कालव्यात वाहून गेल्याची घटना शुक्रवार, 15 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. आज चवथ्या दिवशी रात्री ८ वाजताच्या सुमारास राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाच्या चमूला चांदणीचे प्रेत शोधून काढण्यास यश आले आहे.
गोरठा परिसरातून गेलेल्या पुजारीटोला प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास चांदणी हातपाय धुण्यासाठी उतरली. परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ती वाहून गेली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाच्या चमूतर्फे मागील चार दिवसांपासून चांदणीचा शोध सुरु होता. आज नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि जिल्हा व्यवस्थापन शोध व बचाव पथकाच्या चमूने सकाळपासून शोध सुरू केला. सर्वप्रथम पंपाद्वारे भूयारी कालव्यातील पाण्याचा उपसा करण्यात आला. या कार्याला रात्र तरीही शोध मोहीम सुरू होती. भुयारी सिफन मधील पाण्याचा उपसा झाल्यानंतर पथकाने टॉर्चच्या प्रकाशात शोध घेतला असता चांदणीचे प्रेत सिफन मध्ये अडकून असल्याचे दिसून आले. चार दिवस चाललेल्या या शोधमोहिमेत आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथक आणि आज नागपूर येथून आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या चमूला चांदणीचे प्रेत शोधून काढण्यात यश आले.





