
फटाके विक्रीबाबत दक्षता घेवून
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम, दि. ०2- : जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागामध्ये दीपोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जाणार असून, या उत्सवादरम्यान जिल्हयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावर्षीची दिवाळी पर्यावरणपुरक पध्दतीने साजरी करतांना फटाके न फोडता दिव्यांची आरास मोठया प्रमाणात करावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच फटाके विक्रीबाबत व त्याच्या साठवणूकीबाबत दक्षता घ्यावी. असे सुध्दा कळविण्यात आले आहे.
संयुक्त मुख्य विस्फोटक, नियंत्रक पश्चिम विभाग, नवी मुंबई यांच्या 26 सप्टेंबर 2018 च्या निर्देशान्वये फटाक्यांच्या दुकानांची शेड हे आग प्रतिबंधक व पुर्णत: बंद असणे आवश्यक आहे. शेडमध्ये कोणताही अनोळखी इसम प्रवेश करणार नाही याची व्यवस्था करण्यात यावी. फटाक्यांच्या दोन दुकानामधील अंतर हे तीन मीटर व प्रोजेक्ट वर्कपासून 50 मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या दुकानांची प्रवेशव्दारे एकमेकांकडे करुन नसतील याची दक्षता घ्यावी. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानांच्या भिंतीवर सुरक्षितपणे केलेली असावी. फटाक्यांची डिजीटल ॲडर्व्हटाईज फलके दुकानांच्या 50 मीटर अंतरावर असावी. एका दुकानामध्ये जास्तीत जास्त 100 किलोग्रॅम फायर वर्क्स तथा 500 किलोग्रॅम क्रेकर, स्पार्कलर्स व स्फोटके ठेवली जातील याची दक्षता घ्यावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फटाक्यांच्या दुकानामध्ये ग्रीन फायर क्रेकर विकली जातील या सर्वोच्च्ा न्यायालयाच्या निकालानुसार नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिवाळीच्या कालावधीमध्ये फटाके हे रात्री 8 ते 10 वाजता दरम्यानच फोडावे. गृह मंत्रालयाच्या 20 ऑक्टोबर 2016 च्या निर्देशान्वये उच्च न्यायालय, मुंबई जनहित याचिका क्रमांक 152/2015 श्री. चंद्रकांत नारायण लासुरे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर यामध्ये न्यायालयाने 17 ऑक्टोबर 2016 रोजी दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्ये/ पटांगणामध्ये विक्रीसाठी असणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास कमीत कमी नुकसान होईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. 5 नोव्हेंबर 2020 च्या गृह मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार दिवाळी उत्सवादरम्यान मोठया प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिवाळी उत्सवानंतरही बऱ्याच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्याच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होवून त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेवून नागरीकांनी यावर्षी दिवाळीत फटाके फोडण्याचे टाळून त्याएैवजी दिव्यांची आरास मोठया प्रमाणावर करुन दिवाळीचा उत्सव साजरा करावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.




