
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) दंडकारण्य पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवासचे पत्र
गडचिरोली दि.१०-गडचिरोलीचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची नक्षलवाद्यांकडून मिळालेली तथाकथित धमकी हा त्यांनी स्वतःच रचलेला स्टंट असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) दंडकारण्य पश्चिम ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने ६ नोव्हेंबरला प्रसिध्द केलेल्या एका पत्रकात म्हटल्याने खळबळ उडाली आहे.त्यासोबतच मदत पुर्नवर्सन मंत्री विजय वड्डेटीवारांवर सुध्दा त्यांनी संधीसाधू नेता असल्याची टिका केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मंत्री व गडचिरोली जिल्हयाचे पालक मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना व त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची बातमी आली. त्यात माओवादी पार्टीचेही नाव घेण्यात आले. याचा आम्ही निषेध करतो. आम्ही या पत्रकाव्दारे हे स्पष्ट करीत आहो की या मध्ये भाकपा (माओवादी) चे काही घेणे देणे नाही. हा स्वस्त लोकप्रियता मिळविण्याचा शिंदे यांचा प्रकार आहे. आपले महत्व वाढविण्याकरीता मंत्री व दलाल नेते वेळोवेळी असे स्टंट करीत असतात. यातुन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ही सुटलेले नाही. त्यांनीही स्वतःची हत्या करण्याचे स्वतःच खोटे कारस्थान ‘एनआयए’ व्दारे रचुन लोकप्रिय जनबुध्दिजीवींना कैदेत टाकले. शिंदे यांच्या स्टंट मागे गडचिरोली जिल्हयातील जनतेवर दमन करण्याकरीता वातावरण तयार करण्याचे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील जनता सुरजागड व अन्य लोह प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करीत आहे. त्यांनी जनतेच्या विरोधाला न जुमानता अतिरिक्त पोलीस पाठवून सुरजागड खाण चालू केली आहे. शिंदे, शिवसेना हे लॉयड्स कंपनीचे दलाल आहेत. यात जनतेला काहीही शंका नाही.असेही पुढे म्हटले आहे. वास्तविकपणे शिंदे, वडेट्टीवार किंवा अन्य कोणत्याही नेत्यांना जनतेसमोर उभे ठाकण्याचे नाक उरले नाही. सर्व जनतेच्या नजरेतुन उतरले आहेत. अशावेळी आपली महत्ता मिडीया व्दारे दाखविण्याचा स्टंट केल्या जात आहे. जनतेच्या मुख्य प्रश्नावरून लक्ष विचलीत करून पोलीसी दमनाने सर्वांना दाबणे हेच महाराष्ट्र व केन्द्र सरकारचे धोरण आहे. आम्ही याचा निषेध करतो. असे म्हटले आहे. 





