35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता मॉर्निंग वॉक करणार्‍या कुटुंबाला चारचाकीची धडक; मुलगा ठार तर बहीण व वडील...

मॉर्निंग वॉक करणार्‍या कुटुंबाला चारचाकीची धडक; मुलगा ठार तर बहीण व वडील जखमी

0
303

blank

तिरोडा, दि.13 : तुमसरकडून तिरोड्याकडे लग्नाची वरात घेवून येणार्‍या चारचाकी वाहनाने (अर्टिका, एमएच-49/बीके-9125) मॉर्निंग वॉक करीत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना मागेहून जोरदार धडक दिली. यात मुलगा ठार झाला तर त्याची बहीण व वडील जखमी झाले. तिरोड्यात प्राणांतिक अपघात हा राधेलाल पटले यांच्या गणेश पेट्रोल पंपसमोर आज शनिवार, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.20 वाजता घडला. 

निखिल राजू उपरकर (वय 32) रा. साई कॉलनी तिरोडा असे मृतकाचे नाव आहे. तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तर जखमींमध्ये बहीण नेहा राजू उपरकर (वय 29) व वडील राजू हरिलाल उपरकर (वय 60) रा. साई कॉलनी यांचा समावेश आहे.

सविस्तर असे की, निखिल, नेहा व वडील राजू हरिलाल उपरकर हे तिन्ही बापलेक नेहमीप्रमाणे आज शनिवार, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजता मॉर्निंग वॉक करण्यासाठी घरून निघाले. ते विर्सीकडे जाणार्‍या मुख्य मार्गाने धापेवाडा प्रकल्पाच्या कार्यालयापर्यंत पायदळ जावून घराकडे परत येत होते. दरम्यान सकाळी 5.20 वाजताच्या सुमारास राधेलाल पटले यांच्या पेट्रोल पंपसमोर तुमसरकडून तिरोड्याकडे येणार्‍या चारचाकी वाहनाच्या (अर्टिका, एमएच-49/बीके- 9125) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून तिघांना मागेहून जोरदार धडक दिली. प्रणय मुकेश उके रा. रेल्वे स्टेशन रोड तिरोडा असे आरोपी चालकाचे नाव आहे.

ही धडक एवढी जोरदार होती की, यात निखिल उपरकर 10 फूट दूर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली व रक्त निघाले. तसेच त्याच्या डाव्या पायाचे पूर्ण हाड मोडले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तर नेहा उपरकर हिला चारचाकी घासत गेल्याने तिच्या उजव्या पायाला जखम झाली. तसेच अवघ्या तीन फुटावर पुढेपुढे समोर जात असलेले राजू उपरकर यांच्या कमरेला आणि गुडघ्याला चारचाकीचा मार लागला.

तिथून ते चारचाकी वाहन पुढे जात असताना वडील राजू उपरकर यांनी मागे वळून पाहिले. तेव्हा क्षणभर मुलगा व मुलगी दिसले नाही. नंतर मुलगी खाली पडलेल्या अवस्थेत असताना मुलीला उचलले व निखिल कुठे आहे हे मुलीला विचारले. त्यावेळी समोर निखिल अंदाजे दहा फूट दूर अंतरावर पडून होता. त्या पाठोपाठ येत असलेल्या लग्नातील पाहुण्यांच्या गाडीला थांबवून निखिलचे जखमी शरीर, जखमी वडील व बहिणीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाक्टरांनी निखिलची तपासणी करून मृत घोषित केले. जखमी वडील व बहिणीवर औषधोपचार करून घरी पाठवले.

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात निखिलच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. फिर्यादी भाष्कर हरिलाल उपरकर (वय 54) रा. भुतनाथ वॉर्ड तिरोडा यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड करीत आहेत.

अपघातातील वाहनात नवरदेव-नवरी होते बसून

शुक्रवारी नागपूरला लग्न झाले. नागपूरवरून तिरोड्याला लग्नाची वरात परत येत होती. अपघात घडवून आणणारा सदर वाहन लग्नाची वरात घेवून येत होता. तेथे नवरदेव-नवरी बसून होते. नेमक्या त्याच वाहनाच्या चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून धडक दिल्याने तिरोड्यात प्राणांतिक अपघात घडला. त्यात निखिलचा मृत्यू झाला आणि त्याचे बहीण व वडील जखमी झाले. गोपनीय माहितीनुसार चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता.

मृतक निखिल होता सॉफ्टवेअर इंजिनियर

मृतक निखिल हा पुणे येथे कॅप जेमिनी कंपनीमध्ये साप्टवेअर इंजिनियर होता. त्याचा 7 लाख रुपये असा पॅकेज होता. 2014 पासून निखिल पुणे येथे काम करीत असल्याचे घरच्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागला. तेव्हापासून तो ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असल्याचे सांगितले. तो घरी होता तेव्हापासून दररोज आपल्या वडील व बहिणीसोबत मार्निंग वाकला जात असल्याचे कळले. निखिल हा खूप हुशार, प्रेमळ, समजूतदार व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या अकस्मात अपघाती मृत्युमुळे संपूर्ण नातेवाईक, साई कॉलनी नेहरू वार्ड येथील रहिवासी व संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिरोड्यात प्राणांतिक अपघात घडून त्याचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.

blank