
गडचिरोली--ग्यारापत्ती–कोटगुल या घनदाट जंगलात आज सकाळच्या सुमारास झालेल्या चकमकीत 26 पेक्षा जास्त नक्षल्यांना खात्मा केल्याचे वृत्त प्राप्त झाले असून सी-६० पोलीस जवानांना मोठे यश प्राप्त झाले असून चकमक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस विभागाला सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहिती वरून ग्यारापत्ती–कोटगुल जंगल परिसरात नक्षल असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे सी-६० पोलीस जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना जंगलत दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला असता पोलीसा जवानांनी संरक्षणार्थ प्रतीउत्तर देत नक्षल्यास जशाच तसे प्रतीउत्तर दिले.
हा भाग महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. घटनास्थळी सी-60 च्या 10 पार्टी आहेत.
गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी ही माहिती दिली आहे. जखमी जवानांना उपचारासाठी तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे नागपुरला हलवण्यत आले आहे. आज कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मात्र यामध्ये नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्याचा देखील समावेश असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
जवानांकडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. चकमक झालेल्या ठिकाणास जवानांनी वेढा दिलेला आहे. तर या कारवाईत मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली गेली आहे.





