
गडचिरोली–पोलिस आणि C-60 पथकाने शनिवारी मोठी नक्षलवाद विरोधी कारवाई केली. यामध्ये नक्षलवाद्यांचा महाराष्ट्र सचिव सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. एकूणच 26 नक्षली ठार झाल्याचे सूत्रांकडून समजते. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पार पडलेल्या या कारवाईमध्ये 3 जवान सुद्धा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चकमकीनंतर घटनास्थळावर अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. त्यानंतर नक्षलविरोधी अभियान पथकाने घटनास्थळी शोधमोहीम राबविली. या मोहिमेत दुपारपर्यंत १० ते १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मात्र नक्षलविरोधी अभियान पथकाने जंगलात शोध घेतला असता रक्ताचा सडा आढळला. त्यानंतर घनदाट जंगलात शोध घेण्यात आला असता नक्षलवाद्यांचे आणखी १४ मृतदेह आढळले.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठ वाजेपर्यंत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावर ताब्यात घेण्यात आले. ते रात्री उशिरा गडचिरोली येथे आणण्यात आले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव आणि गडचिरोली पोलीस दलातील अन्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या चकमकीत 3 पोलीस जवान जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोयल यांनी दिली.
ओळख पटविण्याचे काम सुरू
ठार झालेले नक्षलवादी नेमके कोण आहेत त्यांची ओळख पटविण्यासाठी सर्व मृतदेह जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहेत. यातील एक मृतदेह सह्याद्रीचा असू शकतो. यांची ओळख पटविण्यासाठी तज्ज्ञ पोलिसांसह आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींपैकी काही जणांना सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आहे. त्यानंतरच हा सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे होता किंवा नाही हे स्पष्ट होईल. अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
कोण आहे सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे?
मिलिंद तेलतुंबडे हा आरोपी असून त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्याला माओवाद्यांचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. मिलिंदवर 50 लाखांचे बक्षीस आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात तो आरोपी असून फरार आहे. तो आनंद तेलतुंबडे यांचे भाऊ आहेत. बंधूंचा काही संबंध नाही पण एजन्सीचे म्हणणे आहे की, मिलिंदने बंदी घातलेल्या संघटनेच्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी आनंद यांच्या साहित्यांचा वापर केला. 1 मे 2019 रोजी झालेला आयईडी स्फोट मिलिंद तेलतुंबडे यांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे.यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. ३२ वर्षांपूर्वी त्याने चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. ‘वेकोलि’ कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. तो नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती.
अशी झाली कारवाई
आतापर्यत 26 मृतदेह हाती लागले असून जंगलात शोधकार्य सुरू आहे. त्यात आणखी एखादे दोन नक्षल्यांचे मृतदेह हाती लागण्याची शक्यता गडचिरोलीचे एस. पी. अंकित गोयल यांनी दिली. सकाळी 6 ते दुपारी 2.30 अशी साडे आठ तास चकमक चालली. यात सी-60 तुकडीचे पाच जवान जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपुरला हलवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांना जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कमांडो तुकड्यांनी नक्षल्यावर सकाळी 6 वाजताच्या सुमारास हल्ला चढवला. यात पोलिस व नक्षल्यांत तुंबळ लढाई झाली. कोरची येथील सी-60 कमांडोच्या 5 व गडचिरोली येथील दहापेक्षा अधिक अशा सुमारे 200 जवानांनी नक्षल्यांना डोके वर काढू दिले नाही. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यात 26 नक्षली ठार झाल्याची माहिती गोयल यांनी दिली.

कोण आहेत C-60 नक्षलविरोधी कमांडो?
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.
प्रशासकीय कामही करतात सी-60 कमांडो
या कमांडोंना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांना दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी कारवाईचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे प्रशिक्षण हैदराबाद, एनएसजी कॅम्प मानेसर, कांकेर, हजारीबाद येथे केले जाते. नक्षलविरोधी अभियानासोबतच हे जवान नक्षलवाद्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांनाही भेटून त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडतात. नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय समस्यांची माहितीही ते गोळा करतात.




