42 C
Gondiā
Friday, June 12, 2026
Home गुन्हेवार्ता सावली तालुक्यात बनावट प्रतिबंधित तंबाखू कारखान्यावर धाड; 11.31 लाखांचा मुद्देमाल जप्त

सावली तालुक्यात बनावट प्रतिबंधित तंबाखू कारखान्यावर धाड; 11.31 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
4

blank

चंद्रपूर: चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सावली तालुक्यातील रयतवारी येथे मोठी कारवाई करत बनावट प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या अवैध कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल, उत्पादन यंत्रसामग्री आणि एक वाहन जप्त करण्यात आले असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान गडचिरोली येथून कच्चा माल पुरवला जात असल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे स्थानिक आणि FDA विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्याला असणारा गंभीर धोका लक्षात घेऊन प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूच्या अवैध उत्पादनाविरुद्ध चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे, ११ जून २०२६ रोजी सावली तालुक्यातील मौजा रयतवारी येथील एका केंद्रावर धाड टाकून बनावट प्रतिबंधित तंबाखू बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला.

या धडक कारवाई दरम्यान, मुख्य आरोपी विजय भिमाजी भांडेकर (वय ३३ वर्षे, रा. सामदा बु., ता. सावली) याला यंत्रसामग्रीच्या साहाय्याने बनावट तंबाखू तयार करून, त्याचे बेकायदेशीर पॅकिंग व विक्रीसाठी साठवणूक करताना रंगेहात अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने पोलीस स्टेशन सावली व अन्न सुरक्षा विभाग यांच्या संयुक्त पथकाला पाचारण करून संपूर्ण साठा आणि कारखान्याचे साहित्य जप्त केले आहे.

पकडण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी केली असता या रॅकेटचे ‘गडचिरोली कनेक्शन’ समोर आले असून, सदर बनावट तंबाखू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि प्रतिबंधित साठा त्याने विनय गुप्ता (राहणार गोकुळ नगर, गडचिरोली) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून आरोपी हा शासनाचे नियम धाब्यावर बसवून मानवी आरोग्याशी खेळणारा बनावट व घातक तंबाखूचा अवैध व्यवसाय चालवत असल्याचे पूर्णपणे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २ हजार रुपये किंमतीचे HOLA व EAGLE हुक्का शिशा तंबाखूचे प्रतिबंधित सुगंधित पॅकेट्स, २९ हजार ४०० रुपये किंमतीचा १४७ किलोग्रॅम खुला सुगंधित तंबाखू साठा, २ लाख रुपये किंमतीचे तंबाखू पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य व उत्पादन यंत्रसामग्री आणि गुन्ह्यात वापरलेली ६ लाख रुपये किंमतीची टाटा पंच कार (क्र. MH-34-CJ-9625) असा एकूण ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील सखोल तपास सावली पोलीस करीत आहेत.

दरम्यान, सावली परिसरातील अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारखान्यावर अनेक वर्षांपूर्वी देखील धाड मारण्यात आली होती. असे असताना, स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर आता तीव्र संशय व्यक्त करण्यात येत आहे. सावली पोलिसांच्या हद्दीतच इतका मोठा, मानवी आरोग्याशी खेळणारा आणि सुगंधित तंबाखूची भेसळ करणारा कारखाना सुरू असताना स्थानिक पोलिसांनी यापूर्वी कारवाई का केली नाही? यासह अन्न व औषध विभाग झोपेत होता का? कारण प्रतिबंधित तंबाखू व गुटखा वर कारवाई करण्याचे प्रथम काम हे FDA चे आहे मग ते का करीत होते?असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेली गुप्त माहिती स्थानिक पोलिसांना का मिळाली नाही, की याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले? अशी शंका आता व्यक्त होत असून, स्थानिक पोलिसांची संशयास्पद भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पुलरवार (पोलीस स्टेशन सावली) यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या संयुक्त पथकात सपोनि. दीपक काँक्रेटवार, सपोनि. झाडोकर, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोउपनि. सर्वेश बेलसरे, स. फौ. धनराज करकडे, पोहवा. गणेश भोयर, पोहवा. चेतन गज्जलवार, पोहवा. संतोष येलपुलवार, पोहवा. जयसिंग, चपोहवा. दिनेश आराडे, पो. अं. सुमित बर्डे, पो. अं. प्रफुल गारघाटे, चा.पो.अं. मिलिंद टेकाम, ऋषभ बारसिंगे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी श्री मुळे साहेब व श्री उमेश कापगते आणि इतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोखपणे कामगिरी बजावली.