39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ धान खरेदी केंद्रावरील जाचक अटी रद्द करा,केंद्रचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धान खरेदी केंद्रावरील जाचक अटी रद्द करा,केंद्रचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
92

blank

भंडारा,दि.18-जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्या. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा धान खरेदी सुरू न करण्याचा निर्णय सर्व धान खरेदी उपअभिकर्ता यांच्या वतीने घेण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र उपअभिकर्ता यांची सभा 17 नोव्हेंबर रोजी स्थानिक विश्रामगृह येथे घेण्यात आली. यावेळी भंडारा जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रधारक संस्थाचे अध्यक्ष, सचिव, ग्रेडर व गोदाम मालक उपस्थित होते. प्रसंगी सर्व जिल्ह्यातील शासकीय आधारभूत संस्थानी संघटना स्थापन करण्यात आली. यामधे सातही तालुक्यातील प्रत्येकी 2 प्रतिनिधी नेमून एकूण 14 सदस्य समिती गठीत करण्यात आली. प्रसंगी धान खरेदी केंद्र चालवताना येत असलेल्या अडचणीवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालया तर्फे नवीन जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. धान खरेदी केंद्रावर सी.सी. टिव्ही. कॅमेरा लावणे, प्रत्येक कट्टयाला टॅग लावणे, शिलाई मशिनने कट्टे शिवण्याची अट, तसेच गोदामांत एसएक्यू पद्धतीने खरेदी केलेल्या धानाची छल्लि रचने यासारख्या अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. आधीच अल्प कमिशन व धानाची उचल वेळेत केली जात नसताना आठ ते दहा महिने गोदाम वापर करून केवळ दोन महिन्यांचे भाडे दिले जाते. अशाप्रकारे केंद्र चालकांची बोळवण केली जात असताना मार्केटींग कार्यालयातर्फे आणखी अटी व शर्ती लादण्यात आल्याने खर्च वाढवून केंद्र चालविणे कठीण होणार आहे.
अनेक गावांमध्ये शाळा, समाजमंदिर व लहान गोदामामध्ये धान खरेदी केंद्र चालविण्यात येत असल्याने येथे एसएक्यू पद्धतीने खरेदी केलेल्या धानाची छल्ली रचने शक्य नाही. त्यामुळे मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने लावलेल्या नवीन सर्व अटी रद्द करण्यात याव्या, तसेच वेळेवर बारदाना उपलब्ध करून द्यावा, दरवर्षी गोदाम भाडे व संस्थांना खरेदी कमिशन वेळेत देण्यात यावे, संस्थांना वेळेत अनुषंगिक खर्च देण्यात यावा, सध्या धान खरेदीची मुदत 31 जानेवारी पर्यंत आहे, ती 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात यावी, धानाची घट 1 टक्केवरून 3 टक्के करावी, खरेदी सुरू होताच भराडाईसाठी धानाची उचल करावी आदी मागण्या भंडारा धान खरेदी संघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी धार खरेदी केंद्र संचालकांशी बैठक घ्यावी व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा, याविषयीचे निवेदन बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी विनायक बुरडे, माधव बांते, ठाकचंद मुंगुसमारे, अनील टेकाम, सदाशिव ढेंगे यांच्यासह मोठ्या संख्येने धान खरेदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

blank