
गडचिरोली-नवीन वीज मीटर लावून देण्याच्या कामासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करणार्या देसाईगंज येथील शहर वीज वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंता वर्ग-2 यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, 18 नोव्हेंबर रोजी रंगेहाथ अटक केली. निलेश मारोती भोवरे (37) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.
नवीन वीज मीटर लावून देण्याच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य वीज वीतरण कंपनी, शहर वीज वितरण केंद्र देसाईगंज येथील सहाय्यक अभियंता निलेश भोवरे वर्ग-2 याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 8 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सहाय्यक अभियंता भोवरे यास तक्रारदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद तोतरे, गडचिरोलीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक यशवंत राऊत, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, पोलिस नायक राजेश पद्मगिरवार, पोलिस नायक स्वप्निल बांबोळे, पोलिस शिपाई किशोर ठाकुर, पोलिस शिपाई श्रीनिवास संगोजी, चालक पोलिस नायक तुळशिराम नवघरे आदींनी केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक यशवंत राऊत करीत आहेत.





