
नाशिक | लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर (Writer Javed Akhtar) हे नेहमी आपलं मत परखडपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी केलेली वक्तव्य अनेकवेळा चर्चेत राहिले आहेत. अनेकदा तर त्यांना या वक्तव्यामुळे टीकेचा सामना देखील करावा लागला आहे. जावेद अख्तर नुकतेच 94 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मराठी नाटकांबद्दत आपलं मत व्यक्त केलं आहे.
जावेद अख्तर यावेळी संमेलनात बोलताना म्हणाले, ‘मी 19 व्या वर्षी मुंबईत आलो. मला हिंदी उर्दु भाषा माहीत होती. युरोपचं साहित्यही वाचलं होत. तेव्हा मला वाटायचं, माझ्यासारखा कुणीच नाही. मात्र, जेव्हा मी मराठीतील ‘शातंता कोर्ट चालू आहे’ हे नाटक पाहिलं. तेव्हा मला कुणीतरी माझ्या कानात मारली आणि खुर्चीवरून खाली पडल्यासारख वाटलं,’ अशी भावना व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले, ते नाटक पाहून मला माझीच लाज वाटली. मी साहित्यिक कुटूंबातील असूनही मला या महान लेखक विजय तेंडुलकरांविषयी काहीचं माहिती नव्हतं. त्यानंतर मी विजय तेंडूलकराचें इतरही नाटकं पाहिली आणि समजून घेतली. मी असा लेखक पाहिला नव्हता आणि त्यानंतर माझे डोळे उघडले, अशा भावना त्यांनी विजय तेंडुलकरांच कौतुक करताना व्यक्त केल्या.
दरम्यान, जावेद अख्तर 94 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाला उपस्थित राहीले होते. यावेळी त्यांनी मराठी भाषा, मराठी नाटक यांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी यावेळी मराठी कवयित्री बहिणाबाईंसोबत, संत मुक्ताबाईं यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. या कवयिंत्रीचा अभिमान बाळगला पाहिजे असं ते म्हणाले.





