
भंडारा,दि.04,- चर्चा ही एकतर्फी होत नाही. त्यांची इच्छा असल्यास आम्हीही चर्चेची तयारी दाखवू. पण अजून पर्यंत काँग्रेसकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी करून लढण्यास संदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही उलट शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रित निवडणुका लढविण्याची तयारी दर्शविली आहे. कॉंग्रेसची भाषा ही सतत स्वबळाची आहे त्यामुळे आम्हीही आपल्या परीने तयार आहोत असे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भंडारा जिल्ह्यात आलेल्या नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी 21 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जिल्ह्यात होणार आहेत. याच विषयाला घेऊन बोलताना ते म्हणाले निवडणुका आघाडी करून करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आलेला नाही. किंवा त्या दृष्टीने कोणतीही चर्चा सुरू नाही. उलट आज शिवसेनेचे भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांनी आपली भेट घेऊन सोबत निवडणुका लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या या प्रस्तावावर चर्चा केली जाईल असेही मलिक म्हणाले.
काँग्रेसचे नेते राज्यभर स्वभावाची भाषा बोलत आहेत. त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र त्यांची इच्छा असेल तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण चर्चा कधीही एकतर्फी होत नाही असेही सांगण्यात नवाब मलिक विसरले नाहीत. शेवटी स्थानिक स्तरावर होणाऱ्या निवडणुकांचा सर्वस्वी अधिकार पक्षाच्या जिल्हा निवड समितीकडे सोपविला जाईल. त्यांनी आघाडी संदर्भात घेतलेल्या निर्णय तेव्हाच महत्त्वाचा राहील असेही ते म्हणाले. एकटी लढण्याची सातत्याने भाषा बोलणाऱ्या नाना पटोले यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे आम्हीही तयार आहोत असे सांगून एक प्रकारे आव्हान दिले आहे.
निवडणूकीत आरक्षित मतदार संघातून लढणाऱ्या उमेदवारांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदत राज्य मंत्रिमंडळाने दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. एसटी कामगारांच्या संपा संदर्भात बोलताना महामंडळाची विलीनीकरण हे कोणत्याही सरकारला परवडणारे नाही असे सांगत एक प्रकारे आंदोलन कर्त्यांची मागणी कधीही पूर्ण होऊ शकणार नाही असे संकेतच त्यांनी दिले. अनेक महामंडळे आहेत त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. महामंडळे स्वायत्त असल्याने कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत आणि ते घेतलेही जात असल्याचे त्यांनी सांगितले. समीर वानखेडे प्रकरणात छेडले असता नवाब मलिक कुणालाही घाबरत नाही सत्य आहे ते सातत्याने पुढे आणली जाईल असेही ते म्हणाले.





