37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ राज्य शासनाकडून प्राप्त 5 रबर बोटीचे कटंगी जलाशय येथे परीक्षण

राज्य शासनाकडून प्राप्त 5 रबर बोटीचे कटंगी जलाशय येथे परीक्षण

0
36

blank

गोंदिया,दि.10 : जिल्ह्यात मान्सून कालावधीत पूर परिस्थिती व वेगवेगळ्या घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद देऊन जिवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्ती सौम्यीकरणासाठी दि. 08 डिसेंबर 2021 रोजी राज्य शासनाकडून प्राप्त 5 रबर बोटीचे परीक्षण करण्यात आले.

राज्य शासनाकडून गोंदिया जिल्ह्यास 5 रबर बोटीसह इतर महत्वाचे शोध व बचाव साहित्य पुरविण्यात आले आहे. प्रत्येक रबर बोटीसह 1 मोटर इंजिन (OBM), 12 लाईफ जॅकेट, 2 लाईफबॉय, 2 चप्पू, पंचर किट उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त या सर्व शोध व बचाव साहित्यांचे परीक्षण गोरेगाव तालुक्यातील कटंगी जलाशय येथे दि.08 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आले. सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती हाताळण्यासाठी 9 रबर मोटर बोट व 4 फायबर बोट अशी एकूण 13 बोटी उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात नदी, जलाशय, धरण, तलाव इत्यादी ठिकाणी अनेक घटना घडतात. त्यामुळे अशा घटनांवर आळा घालण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नियमित सराव तसेच विविध शोध व बचाव साहित्यांचे परीक्षण करण्यात येते. या ठिकाणी इतर शोध व बचाव साहित्य व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री देखील शोध व बचाव चमूद्वारे करण्यात आली.

जिल्ह्यात पूरपरिस्थितीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये शोध व बचाव पथकामार्फत शोध व बचावकार्य राबविण्यात येते. या वर्षी आमगाव तालुक्यातील जवरी-गोरठा या गावात चांदनी पाथोडे या मुलीचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमध्ये जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत मृतदेह रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यात अशा अप्रिय घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची क्षमता बांधणी करण्यासाठी रबर बोटीचे परीक्षण करण्यात आले.

यावेळेस जिल्हाआपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, दीपक सिंह परीहार, शोध बचाव पथकाचे सदस्य नरेश उईके, राजकुमार खोटेले, जसवंत रहांगडाले, दिनु दिप, चालक- मंगेश डोये, गृहरक्षक इंद्रकुमार बिसेन, चुंन्नीलाल मुटकुरे, जबराम चिखलोंडे, चिंतामण गिरहेपुंजे यांनी रबर बोटीचे परीक्षण केले.

blank