
मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १00 कोटी खंडणीच्या आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात सीबीआयला राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डीजीपी संजय पांडे यांची चौकशी करण्याची मुभा मुंबई हायकोर्टाने दिली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने या प्रकरणात सीबीआयने सीताराम कुंटे, डीजीपी संजय पांडे यांना चौकशीसाठी बजावलेल्या समन्सविरोधात राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रविवारी मोठा धक्का बसला. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना १२ नोव्हेंबरपयर्ंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडी सुनावली होती. यासह उच्च न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणारा विशेष न्यायालयाचा निर्णयही रद्दबातल ठरवला.
मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १ नोव्हेंबर रोजी चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले. मात्र, ईडीने कोठडीची मागणी केली होती. न्यायालयीन कोठडीत पाठवण्याच्या निर्णयाविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.




