
गोंदिया, दि.18 : नवीन गाडी खरेदी करण्यासाठी वडिलांकडून पैसे न मिळाल्याने क्रोधित झालेल्या मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दोरीने आवळून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना 16 ते 17 डिसेंबरच्या रात्रीदरम्यान आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या ग्राम शिवनी येथे घडली. हेमंत लक्ष्मण डोये (वय 23) रा. शिवनी असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे.
शिवणी येथील रहिवासी फिर्यादी वडील लक्ष्मण डोये (वय 50) यांना त्यांचा मोठा मुलगा आरोपी हेमंत लक्ष्मण डोये हा नवीन गाडी खरेदी करण्यासाठी पैसे मागत होता. परंतु फिर्यादीचा लहान मुलगा भुवन लक्ष्मण डोये (वय 19) हा मतिमंद असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी पैसे खर्च होत होते. त्यामुळे ते मोठ्या मुलाला पैसे देवू शकले नाही.
त्यासाठी लहान भावाला जबाबदार मानून क्रोधित झालेल्या आरोपी हेमंतने 16 डिसेंबरच्या रात्री 9 वाजता ते 17 डिसेंबरच्या सकाळी 5 वाजताच्या दरम्यान आपल्या लहान भावाचा गळा दोरीने आवळून त्याची हत्या केली. तसेच वडिलाला सुद्धा जिवानिशी ठार मारण्याची धमकी दिली.सदर प्रकरणात फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 302, 506 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नाडे करीत आहेत.





