33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ अवैध गौण खनिज प्रकरणी लाखोची दंडात्मक कारवाई

अवैध गौण खनिज प्रकरणी लाखोची दंडात्मक कारवाई

0
69

blank

अर्जुनी मोर.दि.28 :-अवैध गौण खनिज प्रकरणी अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालयातील पथकांच्या सहाय्याने तालुक्यात ठिकठिकाणी धाडी घालण्यात आल्या. सन 2020-21 मध्ये अवैध गौण खनिज प्रकरणी दंडात्मक कारवाई करून 43 लाख 52  हजार 950 रूपयांचा महसूल वसूल करण्यात आला.

रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात रेती तस्करी होत आहे. अवैध रेती व्यवसायात अनेकांनी चांगलीच माया जमविली असल्याचे बोलल्या जात आहे. अवैध रेती घाटांचा लिलाव नाही. प्रशासनाने कोणतेही मार्ग काढले नाही. यामध्ये घरकुलांचे स्वप्न पाहणारी सर्वसामान्य जनता मात्र वाढीव दरामुळे नाहक आर्थिक रूपाने भरडली जात आहे.गावागावात रेती तस्करांचे दलाल मात्र कमालीचे सक्रिय दिसतात. तालुक्यात अवैध रेती तस्करीला आळा बसावा म्हणून तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार, सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी धाडसत्र सुरू करून अनेकांच्या रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली.

दंडात्मक कारवाई : नोव्हेंबरपर्यंत साडेबारा लाख महसूल

1 एप्रिल 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कलावधीत 90 प्रकरणांत अवैध गौण खनिज वाहतूक करताना आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. तालुक्यातील पथकाने अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली. अवैध गौण खनिज प्रकरणी 12 लाख 53 हजार 292 रुपये दंडात्मक कारवाईपोटी महसूल वसूल करण्यात आला.

रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त

तालुक्यात सावरी येथून अवैधपणे रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती लागताच तहसीलदार विनोद मेश्राम, मंडळ अधिकारी पवार यांच्यासह इतर कर्मचारी वेळीच दाखल झाले. ट्रॅक्टर क्रमांक एमएच 35/जी 9084, ट्राली क्रमांक एमएच 36-9122 ने विनापरवाना 1 ब्रास रेती वाहतूक करीत असल्याचे आढळले. सदर ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. ट्रॅक्टर मालाकावर 1 लाख 16 हजार 598 रुपये दंड भरण्याचे आदेश तहसील कार्यालयामार्फत देण्यात आले. सदर कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.

blank