35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ या भिंतीत निनादतो चिमुकल्यांचा आक्रोश

या भिंतीत निनादतो चिमुकल्यांचा आक्रोश

0
57

blank

भंडारा,दि.09ः- नऊ महिने नऊ दिवस वाढविलेल्या पोटच्या गोळ्याला त्या चार भिंतीच्या आड उपचारासाठी ठेवले होते. तिथून बरे झाल्यानंतर घरी परतू. नव्या आयुष्याची शिदोरी बांधू, असे स्वप्न बाहेर असलेल्या त्या मातापित्यांनी रंगविले होते. परंतु, काळरात्री घात झाला आणि स्वप्नांची माती झाली. रात्रभर त्या चार भिंतीच्या आत चिमुकल्यांचा आक्र ोश निनादत होता. आज वर्षभरानंतर या भिंतीवर नवे रंग चढविण्यात आले. मात्र चिमुकल्यांचा आक्र ोश सतत दाही दिशा निनादत असल्याचा भास होतो.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता कक्षात ९ जानेवारी २0२१ च्या रात्री दीड वाजता घडलेल्या जळीतकांडात १0 नवजात बालकांचा कोळसा झाला. सुसज्ज असलेल्या या कक्षात धुरशिवाय काहीच दिसत नव्हते. भिंतीचा प्रत्येक कोपरा काळाकुट्ट झाला होता. जीवरक्षक म्हणून असलेली ती यंत्रसामुग्री आगीमुळे वितळून गेली होती. त्या कक्षातील धुरामुळे नवजात बाळांच्या मदतीसाठी धावलेल्यांचे बुटाचे ठसे तेवढे स्पष्टपणे दिसत होते. अशा परिस्थितीत प्राण गमविलेल्या त्या चिमुकल्यांना किती यातना झाल्या असतील, त्यांनी किती आक्र ोश केला असेल, याचा विचारच केला तर मनात धडकी भरते.
आज वर्षभरानंतर या कक्षाची पाहणी केली असता सध्या कक्षाची रंगरंगोटी सुरू आहे. नवीन दिवे, खिडक्या, दारे लावून कक्षाचे सुशोभिकरण केले जात आहे. निष्क्रिीयतेचा काळा डाग पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या आठवड्याभरात हा कक्ष सेवेत दाखल होणार आहे. परंतु, या चार भिंतीआड झालेल्या चिमुकल्यांच्या आक्रोशाचे काय? त्यांच्या मातापित्यांनी रंगविलेल्या स्वप्नांचे काय? व्यवस्थेने कोवळ्या जीवांचा जीव घेतला. त्यांना न्याय देण्याची आश्‍वासने देणार्‍या पांढरपेशांपर्यंत हा आक्र ोश पोहोचेल काय? हा प्रश्न कायम आहे.

blank