
नागपूर-वन कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या प्रथम सूचना अहवाल (एफआयआर) आणि दोषारोपपत्र दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करीत, त्यातील ५0 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या वनपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात सहायक वनसंरक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी करण्यात हिवराबाजार येथे करण्यात आली.
सहायक वनसंरक्षक संदीप गिरी (५२) व वनपाल निशाद अली हसन अली बाबीनवाले (५३, रा.सालई, ता.रामटेक) अशी आरोपींची नावे आहेत. निशाद अली हसन अली बाबीनवाले याची वनविभागाच्या हिवराबाजार, ता.रामटेक येथील कार्यालयात नियुक्ती असून, संदीप गिरी यांची रामटेक कार्यालयात नियुक्ती आहे.
तक्रारकर्त्यावर काही दिवसांपूर्वी वन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणात एफआयआर आणि दोषारोपपत्र दाखल केले जाऊ नये, यासाठी या दोघांनी त्याला एक लाख रुपयांची मागणी केली होती. प्राप्त तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी हिवराबाजार येथील वनविभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचला. निशाद अली हसन अली बाबीनवाले याने पहिल्या हप्त्याचे ५0 हजार रुपये स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात सहायक वनसंरक्षक संदीप गिरी यांचे नाव समोर आल्याने त्यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला.





