
माध्यमिक विभागातील बोसग भरती : आमदार गाणार यांचे आयुक्तांना पत्र
गोंदिया,दि.16-. शासनाची ऑफलाईन शिक्षक भरती बंद असताना देखील जिल्ह्यात माध्यमिक विभागाच्या तत्कालीन दोन शिक्षणाधिकारी यांनी 48 कर्मचारी भरती करून त्यांचे वेतन देखील काढले. यात शासनाच्या तिजोरीवर 2 कोटी 61 लाख 82 हजार 782 रुपयांचा भुर्दंड पडला. याप्रकरणी दोन्ही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून पैशांची वसूली करण्यात यावी, असे पत्र शिक्षण आयुक्तांना शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी पत्रव्यवहार केला.
राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऑफलाईन भरती प्रक्रिया बंद आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पदे भरण्यात येत आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सुनील मांढरे आणि प्रफुल्ल कचवे यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली. त्यातील 48 जणांचे वेतन देखील काढण्यात आले. त्या वेतनावर 2 कोटी 61 लाख 82 हजार 782 रुपयांचा शासनाचा निधी वाया गेल्याचे वेतन अधीक्षक व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक जयप्रकाश जिभकाटे यांनी दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात संस्थाचालक आणि अधिकारी शासकीय तिजोरीची लूट करत आहेत. स्वत:च्या फायद्याकरिता शासनाची दिशाभूल करून शासनाच्या निधीची विल्हेवाट लावणाऱ्या दोन्ही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच दोघांवर फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र शिक्षण आयुक्त यांना शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनी दिले आहे.
आमदार ना. गो. गाणार यांनी 7 ऑगस्ट आणि 13 जानेवारी रोजी विभागाकडे पत्रव्यवहार केला. पत्रातील मुद्द्यांची तपासणी करून प्रचलित शासन नियमानुसार तत्काळ कारवाई करण्याचे कळविले आहे. मात्र शिक्षण संचालनालयाकडे अद्याप अहवाल प्राप्त झाला नाही. दोन्ही तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करून याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सात दिवसांच्या आत संचालनालयाला सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक नागपूर यांना 14 जानेवारीला केल्या आहेत.–डॉ. वंदना वाहूळ,शिक्षण उपसंचालक, पुणे




