
– आर्वी येथील गर्भपात प्रकरण
– आरोपी संख्या झाली सहा
– प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता
वर्धा – जिल्ह्याच्या आर्वी येथे ९ जानेवारी रोजी लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणात दाखल गुन्ह्याच्या तपासात गर्भपाताचे रहस्य उलगडून काढले. याप्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आई व वडिलांसह गर्भपात करणारी डॉ. रेखा कदम आणि २ परिचारिका अशा ५ जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र, या प्रकरणात शनिवारी मध्यरात्री डॉ. नीरज कदम याला पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तपासादरम्यान डॉ. रेखा कदम हिला सुरुवातीलाच अटक केली होती. रेखा कदम हिच्या पोलीस कोठडीतील तपासात झालेल्या बयाणावरुन १२ जानेवारी रोजी रुग्णालय परिसरातील बायोगॅस चेंबरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गर्भपाताचे भ्रुण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासणी केली. मात्र, याच दरम्यान पोलिसांना त्याच चेंबरमध्ये १२ कवट्या अन् ५४ हाडं आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. रेखा कदम यांना सहकार्य करणाऱ्या दोन परिचारिकांनाही अटक केली आहे.शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 45 मिनिटांनी या प्रकरणात डॉक्टर नीरज कदमला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत आर्वी पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणी केली. याच दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात काळविटीची कातडी आढळली तर आरोग्य विभागाच्या पथकाला काही औषधी आणि इंजेक्शन सुद्धा मिळाले असून ते आरोग्य विभागाने जप्त केले आहे.





