38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता वाघ शिकार प्रकरणात ६ आरोपींना अटक; आरोपींना वनकोठडी

वाघ शिकार प्रकरणात ६ आरोपींना अटक; आरोपींना वनकोठडी

0
90

blank

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामघाट वनक्षेत्र कम्पार्टमेंट क्र.२५४ मध्ये एक नर वाघ मृतावस्थेत आढळल्याची घटना १३ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. सदर वाघाची शिकार करण्यात आल्याचा संशय प्राथमिक तपासणीतून समोर आला आहे. मृतावस्थेत आढळलेला वाघ अंदाजे ३ ते ४ वर्ष वयाचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी १७ जानेवारी रोजी ५ तसेच २० जानेवारी रोजी एका आरोपीला अटक केली. या प्रकरणी एकूण ६ आरोपींना ताब्यात घेत त्यांना २१ पर्यंत वनकोठडी ठोठावण्यात आली होती.
अर्जुनी मोरगाव तालुका वनसंपदेने नटलेला तालुका आहे. या तालुक्यात नागझिरा अभियारण्य, व्याघ्र प्रकल्प असल्याने तालुक्यातील जंगलक्षेत्रामध्ये सर्व श्रेणीचे वन्यजीव संचार करताना दिसून येतात. त्यातल्यात्यात दर एक-दोन महिन्यात कधी अपघाती तर कधी शिकार्‍यांचा बळी ठरलेल्या वन्यप्राण्यांच्या घटना समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच गोरेगाव तालुक्यात रेल्वेच्या धडकेत एका रानगव्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वन्यजीव संरक्षणाला घेवून यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आजच्या घटनेने पुन्हा वनविभाग व वन्यजीव संरक्षण विभागाचे कर्तव्य चर्चेत आले आहेत. १३ जानेवारी रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामघाट जंगलक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र.२५४ मध्ये एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक पंचनामा केला असता वाघाचा मृत्यू २४ तासाच्या आत झाला असून त्याची विद्युत करंटने शिकार करण्यात आल्याची बाब समोर आली. मृतावस्थेत आढळलेला वाघ जवळपास ३ ते ४ वर्ष वयाचा असून नर आहे. या घटनेच्या माध्यमातून वनविभागापुढे शिकार्‍यांनी पुन्हा आवाहन उभे केले. या प्रकरणाचा उलगडा करून यंत्रणा शिकार्‍यांची टोळी शोधून काढणार काय? असा सवाल उपस्थित झाला असताना अखेर वनविभागाने सहा आरोपींना या प्रकरणी अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धनराज शिवा चचाणे, ज्ञानेश्वर मधुकर वाघाडे, शरद पांडूरंग मडकाम, विकास गोपाल नेवारे, विलास रामदास सिखरामे व धनपाल माधव कांबळे यांचा समावेश आहे. याशिवाय इतर आरोपींचाही शोध वनविभागाकडून घेण्यात येत असून आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या अधिकार्‍यांनी केली कारवाई
या प्रकरणात गोंदिया वनविभागातील क्षेत्र सहायक, वनरक्षक आदिंनी कामगिरी पार पाडून या आरोपींना अटक केली. यामध्ये यु.गोटाफोडे, आर.डी.राणे, एल.एस.चोले, मिथून चव्हाण, अमोल चौबे, सतिश शेंद्रे, श्रावण धनसकर, सुनिल शेळके, प्रकाश पातोडे आदिंनी महत्वाची कामगिरी पार पाडली.

blank