
नाशिक-मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे जवळ रायगडनगरजवळ एका जळालेल्या कारमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा वाजे (३८) यांचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून दाेन दिवस उलटूनही मृत्यूचे गूढ कायम आहे. ही घटना घातपातच असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पाेलिस तपास संथ गतीने हाेत असल्याने डाॅ. वाजे यांच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
याप्रकरणी वाडीवऱ्हे पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. सुवर्णा वाजे या मनपाच्या माेरवाडी श्री स्वामी समर्थ आराेग्य केंद्र येथे तीन वर्षांपासून कार्यरत हाेत्या. डाॅ. वाजे या मंगळवारी कामावर हजर हाेत्या. सायंकाळी ५ पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत त्यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांच्या चेहऱ्यावर अथवा कामात काहीही तणाव नव्हता, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांचे पती संदीप वाजे यांनी मंगळवारी रात्री ७ वाजता त्यांनी डाॅ. सुवर्णा यांना फाेन केला असता त्यांनी ताे कट करून आपल्याला रुग्णालयातच वेळ लागणार असून रात्री १० वाजेनंतर घरी येऊ असा मेसेज केला. दहा वाजून गेल्यानंतरही डाॅ. वाजे घरी न आल्याने त्यांच्या पतीने पुन्हा काॅल केल्यावर माेबाइल स्विच आॅफ आला. त्यामुळे पतीने यांनी थेट माेरवाडी रुग्णालयात जाऊन चाैकशी केली. त्यावर आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारासच घरी गेल्याचे सांगण्यात आले. त्यांनतर वाजे यांनी आपल्या घरी व सासरच्या मंडळीकडे सुवर्णा विषयी चाैकशी केली. मात्र, त्या घरी आल्याच नसल्याचे समजले.
डीएनए चाचणी करणार
वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनास्थळी न्याय वैद्यक प्रयोगशळेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील वाहनातील जळलेल्या मृतदेहाच्या अस्थींचे काही नमुने घेतले असून डीएनए तपासणी पण केली जाणार आहे. अनिल पवार, पोलिस निरीक्षक, वाडीवऱ्हे
कुटुंबीयांनी साडेअकरा ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत घेतला शाेध
डाॅ. सुवर्णा यांच्या शाेधासाठी पती व त्यांचे वडील, कुटुंबीयांनी अबंड पाेलिस ठाण्यात रात्री अकरा वाजता धाव घेत मिसिंगची तक्रार दिली. पाेलिसांनी संदीप यांच्याकडून डाॅ. वाजे यांच्या माेबाइल नंबरवर लाेकेशन ट्रेस केले असता ते विल्हाेळी जवळ आढळले. त्यावर पाेलिसांनीही त्यांचे माेबाइल क्रमांक तपासून बघितले असता ते बंद आढळून आले. त्यानुसार वाजे कुटुंबीयांनी साडेअकरा ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत परिसरात शाेध घेतला. मात्र, त्या कुठेही आढळल्या नाहीत. सकाळी नाशिक-मुंबई महमार्गापासून अंदाजे शंभर फुट दूर लष्करी हद्दीजवळ जळालेली कार आढळली. कुठल्या पदार्थाने ही आग लागली त्याची तपासणी अग्निशमन दल व परिवहन विभाग करत आहेत. जागेवरच शवविच्छेदन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.





