
गोंदिया : डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत डव्वा येथे जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापडा रचून जुगार अड्ड्यावर धाड मारली. यावेळी सात आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी एकूण २ लाख १८ हजार १८0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना ३१ जानेवारी रोजीची आहे. सविस्तर असे की, डुग्गीपार पोलिस ठाणे हद्दितील डव्वा येथील डीकेव्ही. भोजनालयाच्या मागील पळीत जागेत काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार सचिन वांगळे यांच्या नेतृत्वात पथक घटनास्थळासाठी रवाना झाला. दरम्यान सापडा रचून जुगार अड्ड्यावर धाड मारली. यावेळी फळावर असलेले १५00 रुपये रोख, अंगझळतीत १६ हजार ६४0 रुपये, ४ मोटारसायकल व तासपत्ते असा एकूण २ लाख १८ हजार १८0 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपी शैलेश धनिराम लटिये (२९) रा. डव्वा, ईश्वरदास जगन्नाथ लंजे (५0) रा. कोहडीटोला, नितीन रमेश भिमटे (३५), रमेश सोहनलाल अग्रवाल (५१) रा. डव्वा, संजय ढेकल येडे (३५) रा. खजरी, धनपाल मुलचंद टेंभुर्णे (३९) रा. डव्वा, वामन आनंदराव खोटेले (४२) रा. कोहडीटोला यांना ताब्यात घेवून यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवा. धावडे करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार सचिन वांगळे, पो.हवा. जगदेश्वर बिसेन, शिवलाल धावडे, उत्तम दहिवले, संतोष राऊत, झुमन वाढई, महेंद्र सोनवाने, सुनिल डहाके आदींनी पार पाडली.





