
लाखांदूर– सरकारी स्वस्त धान्य दुकानातून गरजू लाभार्थ्यांना वेळेवर अन्नधान्याचा वाटप होत नाही. मात्र सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वाटप होणारा तांदूळ खुलेआम बाजारात अवैधरित्या विकल्या जात असून, लाखांदूर येथील एका खासगी गोदामावर अन्न पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी टाकलेल्या धाडीत १२0 कट्टे तांदूळ मिळाला असून, मिळालेले तांदूळ अधिकार्यांनी जप्त केला आहे.
लाखांदूर येथील पवनी- लाखांदूर टी- पॉइंट जवळील दादा उर्फ सुखलाल बिसेन यांनी बारदाणा विक्रीसाठी मोठय़ा गोदामाचे बांधकाम केले असून, या गोदामातून शासकीय धान्याची मोठय़ा प्रमाणात तस्करी केल्या जात असल्याची नागरिकात ओरड आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून या गोदामात तांदुळाची अवैधरित्या साठवणूक केल्या जात असून, स्वत: गोदाम मालिक सुखलल बिसेन हा व्यवहार करीत असल्याची माहिती आहे. अन्न पुरवठा निरीक्षक शहारे यांना सदर गोदामात सरकारी तांदूळ ट्रॅक्टरद्वारे आणून साठवणूक केल्या जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी सदर गोदामावर धाड टाकली असता एम.एच.३६/झेड ७0९६ या ट्रॅक्टरमधून १२0 तांदुळाची भरलेली कट्टे उतरवताना रंगेहाथ पकडले.
या संदर्भात सदर सरकारी तांदूळ हे पवनी तालुक्यातील निघवी येथील अशोक तरोने यांनी स्वत:च्या ट्रॅक्टरद्वारे पाठवले असल्याची माहिती गोदाम मालक सूखलाल उर्फ दादा बिसेन यांनी अधिकार्यांना दिली. यावरून अन्न पुरवठा निरीक्षक शहारे यांनी पंचनामा करत पंचाच्या सह्या घेतल्या तसेच कागदपत्रांची पूर्तता करणाच्या सूचना देऊन संपूर्ण १२0 कट्टे तांदूळ जप्त केले. सदर प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकार्यांकडे कळविण्यात आल्याने लाखांदूरातून मोठय़ा प्रमाणात सरकारी तांदुळाची तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. दादा बिसेन यांनी केवळ बारदाना विक्री केंद्र सुरू केले असताना हेच गोदाम आता सरकारी धान्याची तस्करी करण्याचे मोठे केंद्र बनले आहे.
लाखांदूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानावर आपल्या एजंटद्वारे मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या सरकारी तांदूळ येथे विकत असून, हे हेच तांदूळ तालुक्यातील राईस मिल मालकांना विकल्या जात असल्याने शासकीय तांदुळाचा मोठा गैरव्यवहार येथे सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पवनी तालुक्यातही मोठय़ा प्रमाणात सरकारी धान्य अवैधरित्या विकून संपूर्ण माल लाखांदूर येथील बिसेन यांच्या गोदामात खरेदी करून साठवण केल्या जात आहे. लाखांदूर येथील अन्नपुरवठा निरीक्षक शहारे यांनी सदर प्रकरणी तत्काळ कारवाई करून वरिष्ठ अधिकार्यांकडे तपासणीसाठी माहिती दिली आहे. दरम्यान लाखांदूर येथील दादा बिसेन यांच्या गोदामात साठवणूक केलेल्या तांदुळाची सखोल तपासणी केल्यास मोठा घबाड उघडे पडू शकतो. लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठय़ा अवैध तांदूळ तस्करी केंद्राची चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.





