38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ महानगरपालिका आरोग्य विभागातील 56 पदे आस्थापनेत समायोजित करण्याचा आमसभेत ठराव पारित

महानगरपालिका आरोग्य विभागातील 56 पदे आस्थापनेत समायोजित करण्याचा आमसभेत ठराव पारित

0
23

blank

चंद्रपूर । शहर महानगरपालिकाअंतर्गत आरोग्य विभागात ग्रँट इन एड योजनेअंतर्गत मंजूर वेतनश्रेणीवर 18 अधिकारी – कर्मचारी व प्रजनन व बाल आरोग्य फेज 2 अंतर्गत योजनेअंतर्गत मंजूर मानधनावर 38 अधिकारी व कर्मचारी असे एकूण 56 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना महानगरपालिका आस्थापनावर समावेश करण्यासाठी ठराव पारित करण्यात आला.
 
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात 23 फेब्रुवारी रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत या विषयास मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी संजय कंचर्लावार होत्या. यावेळी महापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख ,आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने सामावून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील चर्चेमध्ये 28 मे 2013 चे मंजुरीअनन्व्ये चंद्रपूर महानगरपालिका येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकातील मंजूर असलेल्या 19 पदावर सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नमूद १२ पदांवर वयाची व बिंदूनामावलीची अट शिथिल करून प्रथम समायोजन करण्यात यावे व सध्यास्थितीत कार्यरत असलेले 24 पदे मनपातील आकृतिबंध यामध्ये मंजूर नाहीत, अशा पदांना मंजुरी मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे नगर विकास विभागाच्या उपसचिव यांनी निर्देश दिले होते. सदरच्या ४४ पदांना शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर त्यांना मंजूर पदावर समायोजन करताना त्यांना वयाची व बिंदुनामावली अट शितल करून त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्या सेवा प्रवेशापासून रिक्त पदावर त्यांना मनपाच्या आस्थापनेवर सेवेत सामावून घेण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात आले.
 
महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य सेवा देण्यासाठी ग्रँट इन एड व प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज दोन या दोन्ही केंद्र शासनाच्या योजना अनुक्रमे 1980 व 2006 पासून कार्यान्वित आहेत. या योजनेतील सद्यस्थितीत कार्यरत अधिकारी व कर्मचारी हे मनपा आरोग्य विभाग मुख्यालय व मनपा शहरी आरोग्य केंद्र क्रमांक एक ते सात येथे विविध पदांवर कार्यरत आहेत. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना covid-19 या विषाणूच्या जागतिक महामारीच्या काळात आरोग्य विभागासाठी सेवा देत आहेत. आरोग्य विभागातील सद्यस्थितीत कार्यरत एकूण 56 अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपाच्या आकृतिबंधावर समायोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर आज 23 फेब्रुवारी रोजी शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पारित करीत पुढील मंजुरीसाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी मानले आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कुटुंब कल्याण व माता संगोपन कार्यक्रम व प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज 2 अंतर्गत पालिका अधिनस्थ कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या 56 पदांना महानगर पालिका आस्थापनेवर समावेश करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली. हा निर्णय घेतल्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीने माजी वन व अर्थ मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले. 
मनपात महापौर राखी कंचर्लावार, सभापती संदीप आवारी, सभागृह नेते देवानंद वाढई आणि मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांचे पुषपगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत, शरद नागोसे, सतीश अलोने यांच्यासह परिचारिकांची उपस्थिती होती..

blank