
तिरोडा, दि.24 : तिरोडा पोलिसांनी संत रविदास वॉर्डात सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड मारली. यात तब्बल 1 लाख 40 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आली. (Tiroda police raid illegal liquor den)
सविस्तर असे की, 23 फेब्रुवारी पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी येणाऱ्या तिरोडा नगर परिषद निवडणूक संबंधाने शहरातील अवैध दारू अड्ड्यावर कारवाईची विशेष मोहीम केलेली आहे. त्या निमित्ताने तिरोडा शहरात पेट्रोलिंग करीत असताना संत रविदास वॉर्ड तिरोडा येथे सुरज बरियेकर याच्या घरी मोहफुलांची दारू गाळण्याची भट्टी सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अधिक पोलीस अंमलदार बोलावून त्यांच्या मदतीने छापा टाकला. त्यात सुरज बरियेकर याच्या घरी मागील खोलीत मोहाफुलांची दारू काढण्याच्या 2 भट्टया सुरु असल्याचे आढळले.
एकूण 1 लाख 40 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यात आरोपी (1) सुरज प्रकाश बरियेकर, (2) माया प्रकाश बरियेकर दोन्ही रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा व (3) भूमेश्वर नेपाळचंद चाचेरे रा. महात्मा फुले वॉर्ड तिरोडा यांच्याविरुद्ध कलम 65 (ब, क, ड, इ, फ), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी, सोबत पोलीस हवालदार नितेश बावणे, कुळमेथे, नापोशि श्रीरामे, महिला नापोशि भूमेश्वरी तिरिले, पोशि अंबादे, चालक शेख यांनी केलेली आहे. सदर विशेष मोहीम सातत्याने सुरु आहे. कोणालाही अवैध धंदेबाबत माहिती असेल त्यांनी पोलीस ठाण्याला कळवून सहकार्य करावे. नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी केले आहे.





